ब्युरो टीम: भारताच्या महिला क्रिकेट संघानं २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक निश्चित केलं आहे. भारतानं उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव करत विजय मिळवला.
या मोठ्या विजयासह भारताला फायनलचे तिकीटही मिळालंय. आता भारत अंतिम सामन्यात सुवर्ण पदकासाठी प्रयत्न करेल. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेट या खेळात भारत प्रथमच खेळत आहे. यापूर्वी भारतानं या स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता आणि तेव्हा बांगलादेशने रौप्यपदक पटकावलं होतं.
परंतु यावेळी भारतीय महिला क्रिकेट संघानं बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाचा जबरदस्त पराभव केला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना २५ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या संघाशी होईल.
टॉस जिंकून पहिले फलंदाजी
उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेशच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, भारताच्या पूजा वस्त्राकरच्या माऱ्यासमोर बांगलादेशच्या खेळाडूंना उभं राहणं कठीण झालं. पूजाच्या या जबरदस्त गोलंदाजीचा परिणाम असा झाला की बांगलादेशचा संघ २० षटकेही खेळू शकला नाही आणि १०० धावांच्या जवळपासही धावा करू शकला नाही.
५१ धावांवर संघ माघारी
बांगलादेशचा संपूर्ण संघ भारताविरुद्ध १७.५ षटकांत ५१ धावांवर माघारी परतला. यामध्ये भारतीय गोलंदाज पूजा वस्त्राकरने मोठी भूमिका बजावली. तिनं ४ षटकात १७ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. पूजा वस्त्राकरनं पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळी केल्याचं पाहायला मिळालं.
८ गडी राखून विजय
बांगलादेशच्या संघानं केलेल्या ५१ धावा ही महिलांच्या T20 क्रिकेटमधील भारताविरुद्धच्या सर्वात कमी धावसंख्या होती. दरम्यान, भारतासमोर विजयासाठी ५२ धावांचं लक्ष्य होतं. भारतानं ते २ गडी गमावून पूर्ण केलं. भारताकडून जेमिमानं सर्वाधिक नाबाद २० धावा केल्या. तर शेफाली वर्मा १७ धावा करून बाद झाली. भारतीय संघाची पहिली विकेट स्मृती मानधनाच्या रूपाने पडली. ती ७ धावा करून बाद झाली.
टिप्पणी पोस्ट करा