ब्युरो टीम: अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी राम मंदिराच्या लोकार्पणाची तारीखही सांगितली. मंदिराचे बांधकाम सुरू असतानाही देशभरातील लोकांकडून अयोध्येला भेट देण्यात येत असून मंदिरस्थळी भेटवस्तूही दिल्या जात आहेत.
नुकतेच राजस्थानमधून अयोध्येत आणण्यात आलेल्या एका कोरीव नक्षीदार दगडाची चांगलीच चर्चा होत आहे. या दगडावर भारत नाव लिहिले असून एक भारत, सर्वश्रेष्ठ भारत असे घोषवाक्यही त्यावर दिसून येत आहे.
देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत मोदी सरकारविरुद्ध इंडिया आघाडीची स्थापन केली. त्यानंतर, भाजपानेही त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीला भारत नावाने उत्तर देण्याचं काम केंद्रातील भाजपप्रणीत सरकारने केलंय. म्हणूनच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी२० परिषदेत इंडियाऐवजी भारत नाव त्यांच्यासमोर लावले होते. तर, राष्ट्रपतींचा उल्लेख करतानाही, प्रेसिंडेंट ऑफ भारत असे संबोधल्याचं पाहायला मिळालं. यावरुन चांगलाच वाद रंगला. अगदी सोशल मीडियातून हा वाद गावांपर्यंतही पोहोचला. त्यामुळे, भारत आणि इंडिया नावावर जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, जोधपूर येथून आलेल्या काही राम भक्तांनी भारत नावाचा कोरीव दगड श्रीराम जन्मभूमी क्षेत्र ट्रस्टकडे समर्पित केला आहे. देशात नावावरुन सुरू असलेला वाद आणि राजकीय इंडिया विरुद्ध भारत अशा चर्चेत अयोध्येत पोहोचलेला हा कोरीव दगड चर्चेत आला आहे. हमारा देश, हमारा नाम... असेही या कोरीव दगडावर लिहिले आहे.
टिप्पणी पोस्ट करा