Congress: काँग्रेसमधील गटबाजी उघड, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; हुड्डा-सुरजेवाला समर्थकांमध्ये हाणामारी

 

ब्युरो टीम: हरियाणातील कर्नाल येथील सभेदरम्यान प्रदेश काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजी पाहायला मिळाली. येथे दोन गटांचे समर्थक एकमेकांशी भिडले आणि दोघांनी एकमेकांना लाथा-बुक्कांनी माराहाण केली.

तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊसमध्ये कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी काही नेते गेले होते. याच दरम्यान त्यांच्या विरोधात गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमादरम्यान कार्यकर्ते आपापसात भिडले.

भूपेंद्र सिंग हुड्डा आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या समर्थकांनी एकमेकांशी हाणामारी केली आणि लाथा-बुक्क्या मारल्या. योगराज जिल्हा प्रभारी लहरी सिंह यांच्यासोबत बैठकीसाठी आले होते. मात्र यावेळी त्यांच्या विरोधात गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. कारवर लावलेल्या लाऊड ​​स्पीकरमधून मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात होती. दरम्यान, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश सलुजा तेथे आले.

सलुजा यांनी गाडीतून लाऊडस्पीकर काढून टाकला. यावरून दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली. हाणामारीत सलुजाचा चष्मा तुटला, मात्र त्यांनी लाऊडस्पीकर जमिनीवर फेकून फोडला. यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाली. सुमारे 15 मिनिटं हा गोंधळ सुरू होता. ही सर्व घटना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे समन्वयक योगराज भदौरिया, हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे समन्वयक जर्नेल सिंग आणि एसएल शर्मा यांच्यासमोर घडली.

संघटनेच्या स्थापनेसाठी झालेल्या बैठकीची माहिती त्यांना देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला. गोंधळानंतर हुड्डा गटाचे समर्थक संघटना स्थापनेच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विश्रामगृहाच्या आत गेले आणि बाहेर इतर गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. यामुळे काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने