Devendra fadanvis : जगाचे लक्ष भारताकडे ; कोशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण करण्याची वेळ- देवेंद्र फडणवीस

 

 ब्युरो टीम :   भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आले आहे व संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. अशावेळी जगाच्या गरजेनुसार काैशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे उद्याेग व आयटीआय यांचे समन्वय साधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे काैशल्य असलेले मनुष्यबळ निर्मिती करणे, ही काैशल्य शिक्षण व प्रशिक्षण विभागाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

काैशल्य, राेजगार, उद्याेजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने आयटीआय प्रशिक्षणार्थिंचा दीक्षांत समारंभ रविवारी आयाेजित करण्यात आला. याप्रसंगी काैशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लाेढा, या विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक पुरुषाेत्तम देवतळे, आमदार माेहन मते, आमदार प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित हाेते. यावेळी विदर्भातील आयटीआयच्या विविध ट्रेडमधून गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या ३५ विद्यार्थ्यांना पदक व मानचिन्ह व शेकडाे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, डिग्री महत्त्वाची आहे पण त्यापेक्षा काैशल्याचे महत्त्व अधिक आहे. येत्या काळात इंजिनीयर पदवीधरापेक्षा आयटीआयचे काैशल्य प्रशिक्षित उमेदवारांना मागणी अधिक राहिल. पूर्वी बारा बलुतेदार म्हणून ओळख असलेल्या कारागिरींवर गावांची अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण हाेती. कालाैघात या काैशल्याला आधुनिक जाेड मिळाली नाही, त्यामुळे गावगाडे काेसळले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पीएम विश्वकर्मा याेजना सुरू केली आहे, ज्याद्वारे १८ वेगवेगळ्या व्यवसायासाठी काैशल्य प्रशिक्षण व उद्याेगासाठी अर्थसहाय्य करण्यात येईल. याप्रकारे तंत्रज्ञानयुक्त बारा बलुतेदार व्यवस्थेतून देशाची अर्थव्यवस्था विस्तारित करण्यात येईल, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.

मंगल प्रभात लाेढा यांनी पुढच्या दाेन वर्षात आयआयटीपेक्षा आयटीआयचे महत्त्व वाढेल व आयआयटीची मुले आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यास येतील, असा दावा केला. येत्या काही दिवसात गावागावात शेकडाे काैशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येईल. येणाऱ्या 'व्हाईट स्काॅलर' नाही परिश्रम करणाऱ्यांना सन्मान मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक दिगंबर दळवी यांनी केले तर आशिष कुमार सिंग यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने