ब्युरो टीम: मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून सुरु केलेलं बेमुदत उपोषण मागे घेतलं. मराठा आरक्षणासाठी आपला लढा सुरुच राहणार आहे. मात्र आपण सगळ्यांच्या आग्रहास्तव उपोषण मागे घेत आहोत अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटी गावातल्या उपोषण स्थळी केली. मनोज जरांगे त्यांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन त्याच जागी सुरु ठेवणार आहेत. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकार्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे. मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा. सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही. मात्र, सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या. आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु आहे. भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेलं बेमुदत उपोषण आज (१४ सप्टेंबर) १७ व्या दिवशी सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात येऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर शिंदेंच्या हस्ते फळांचा रस घेत जरांगेंनी उपोषण सोडलं. यानंतर उपस्थितांसमोर बोलताना मनोज जरांगेंनी पहिली प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “राज्यातील ही पहिली घटना आहे म्हणून कौतुक करायला हवे. आतापर्यंत जे कधीच घडलं नाही, ते आज घडलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मराठा आरक्षणाच्या विषयात लक्ष घालून आमरण उपोषण सोडवायला जालन्यात आले. त्यांचे मराठा समाजाच्या वतीने त्यांचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत.”
“मराठा समाजाला न्याय देऊ शकणार असेल, तर फक्त एकनाथ शिंदे”
“या टाळ्यांचा विजय होईल हा शब्द देतो. तुमची टाळी वाया जाणार नाही. मी २९ ऑगस्टला आंदोलन सुरू झालं तेव्हापासून प्रत्येकवेळी सांगत होतो की, मराठा समाजाला न्याय देऊ शकणार असेल, तर फक्त एकनाथ शिंदे,” असं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं.
टिप्पणी पोस्ट करा