ब्युरो टीम: जर तुम्ही अॅसिडिटी-गॅस, छातीत जळजळ किंवा पोटदुखी यांसारख्या स्थितीत डायजिन जेल सिरप घेत असाल तर या ठिकाणी लक्ष द्या. ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियानं डॉक्टरांना डायजिन जेल सिरप बाबत एक अॅडव्हायझरी जारी केली आहे.
या अलर्टद्वारे डायजिन जेलच्या वापरवर बंदी आणि सिरप तयार करणाऱ्या कंपनीला बाजारात उपलब्ध असलेली औषधं परत घेण्याचा आदेश दिला आहे. एका ग्राहकाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाच्या वतीने, डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांना हे उत्पादन न वापरण्याचा सल्ला देण्यास सांगितलं आहे आणि याच्या वापरानं काही रिअॅक्शन होत असतील तर त्यांना त्वरित तक्रार करण्यासही सांगावं असंही म्हटलं आहे. डॉक्टरांनादेखील काही संशयास्पद केस मिळाली तर त्याची माहिती त्वरित देण्यास सांगण्यात आलंय.
त्याचवेळी, गोव्यातील फॅसिलिटीमध्ये तयार करण्यात आलेले या कंपनीचे डायजिन सिरप वापरू नये, असं ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडियाच्या वतीने रुग्णांना सांगण्यात आले. त्याचवेळी घाऊक विक्रेते आणि वितरकांना गोव्याच्या कंपनीतून तयार झालेले प्रोडक्ट आले असल्यास ते परत करण्यास सांगण्यात आलंय. अशा उत्पादनाची ग्राहकांना विक्री करू नये, असंही त्यांनी म्हटलंय.
काय आहे प्रकरण?
डायजिन सिरप खरेदी केलेल्या एका ग्राहकानं ९ ऑगस्ट २०२३ रोजी एक तक्रार केली होती. डायजिन जेल मिंट फ्लेवरची एक बाटली सामान्य चव आणि हलकी गुलाबी रंगाची आहे. तर त्याच बॅचच्या दुसऱ्या एका बाटलीतील औषधाची चव कडवट आहे. त्यात त्याचा वास उग्र आणि रंगही पाढरा आहे. ग्राहकाच्या या तक्रारीनंतर सिरप तयार करणारी कंपनी एबॉटनं ११ ऑगस्ट रोजी आपला प्रोडक्ट बाजारातून परत मागवत असल्याचं डीसीजीआय कार्यालयाला सांगितलं.
कंपनीनं काय म्हटलं?
निराळ्या प्रकारची चव आणि वासावर ग्राहकांकडून आलेल्या तक्रारीमुळे भारतात एबॉटनं आपल्या गोव्यातील कंपनीत तयार केलेलं डायजिन जेल हे औषध बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं मीडिया रिपोर्ट्सनुसार एबॉट कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
टिप्पणी पोस्ट करा