Lata Mangeshkar : सांगलीत होणार लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ ; विजयसिंहराजे पटवर्धन यांनी दाखवली जागा देण्याची तयारी '

 


ब्युरो टीम : लता मंगेशकर यांच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, लतादीदी सांगलीच्या असल्याने त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सांगलीतच उभे करावे.

त्यासाठी आवश्यक जागा गणपती पंचायतमार्फत देऊ, अशी घोषणा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.

ते म्हणाले की, संपूर्ण जगभरात लतादीदींचे नाव आहे. त्यांच्या कुटुंबियांचे बालपण याठिकाणी गेले. मंगेशकर कुटुंबियांची नाळ या शहराशी जोडली गेली आहे. त्यामुळे सांगलीला त्यांच्या नावे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुरु करावे. ज्यात केवळ संगीत शिक्षणच नव्हे तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचाही समावेश करावा. असे विद्यापीठ झाल्यास सांगलीचे नाव या कारणासाठी पुन्हा जगाच्या नकाशावर कोरले जाईल. विद्यापीठासाठी जागेची आवश्यक आम्ही पूर्ण करु. पंचायतन अशा उपक्रमांसाठी जागा द्यायला तयार आहेत. या विद्यापीठात गोरगरिब विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे शिक्षणही मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे. शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव आम्ही देणार आहोत.

सांगलीच्या विकासाकरीता हवे ते सहकार्य

शासनाकडे आम्ही यापूर्वी सांगलीच्या विकासाचे अनेक प्रस्ताव दिले आहेत. त्याचा विचार शासनाने करावा. विमानतळासाठी हातकणंगले तालुक्यातील रामलिंग डोंगराचा प्रस्ताव दिला होता. पोलिसांची निवासस्थाने आम्ही आमच्या खर्चातून उभारण्यास तयार आहोत. याशिवाय सांगलीत महाविद्यालये उभारण्याचाही मानस आहे.

विद्यापीठ उपकेंद्राला जागा देऊ

बस्तवडे (ता. तासगाव) येथे पंचायतनची चारशे एकर जमीन आहे. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र उभारायचे असेल तर आम्ही ही जागा त्यांना उपलब्ध करुन देऊ. सांगलीतील विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमचा पुढाकार असेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने