ब्युरो टीम: लाठीहल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी बुधवारी सकाळी अंतरवाली सराटी ग्रामस्थांशी संवाद साधला. चौकशीसाठी पोलिसांची वाहने गावात आली तरी घाबरू नका, प्रशासनाचे तुम्हाला सर्व ते सहकार्य राहिल, अशी ग्वाही सक्सेना यांनी अंतरवाली सराटी ग्रामस्थांना दिली.
तसेच सक्सेना यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेवून संवाद साधला.
अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाचा आज नववा दिवस असून, बुधवारी सकाळी ८ वाजता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणस्थळी असलेल्या डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावून उपचार केले. अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. घटनेनंतर जे गुन्हे दाखल झाले आहेत त्या बाबत सखोल चौकशी होईल. याबाबत पोलिस अधीक्षक चौकशी करतील असेही अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी सांगितले.
त्यानंतर समनवय समितीचे सदस्य, सरपंच यांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित अनेकांनी चुकीच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. जे बाहेरगावी होते, अशांचीही नावे आरोपी म्हणून आल्याचेही सांगण्यात आले. यावेळी गावातील नागरिकांसह महिला उपस्थित होत्या.
गावकऱ्यांनी ठरवली आचारसंहिता
समन्वय समिती प्रशासनाच्या संपर्कात आहे. गावात शांतता रहावी, यासाठी ग्रामस्थांनी काही अचार संहिता तयार केली जाणार आहे. यात गावात येणाऱ्यांनी घोषणाबाजी करू नये, मद्यपिवून कोणीही गावात येवू नये, गोंधळ घालू नये आदी सूचना दिल्या जाणार आहेत. त्यासाठीचे सूचना फलक गावात लावून, सोशल मीडियावरही प्रसिद्ध केले जाणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या लढ्यातील आंदोलन सर्वांनी शांततेत करावे, असे आवाहनही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा