ब्युरो टीम: मराठा आरक्षणाला पँथरच्या काळापासून आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे या आंदोलनातही आम्ही तुमच्या सोबत आहोत. गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात लवकरात लवकर तोडगा काढावा, यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपण बोलू, असे 'रिपाइं'चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 'माध्यमांना' सांगितले.
अंतरवाली येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यासंदर्भात ग्रामस्थ तसेच उपोषणार्थी मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी रामदास आठवले हे बुधवारी सायंकाळी दिल्लीहून छत्रपती संभाजीनगर शहरात आले. विमानतळावरूनच ते 'रिपाइं'चे प्रदेशाध्यक्ष बाबूराव कदम, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके, जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, शहराध्यक्ष नागराज गायकवाड, प्रवीण नितनवरे, शरद कीर्तीकर, विलास सौदागर, दिनेश चांदणे आदींसह अंतरवालीला गेले. तेथे मनोज जरांगे व ग्रामस्थांची भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत. आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सुटला पाहिजे, यासाठी राज्य शासनाला बोलेन, असा दिलासा देऊन ते रात्री शहरात दाखल झाले. सुभेदारी विश्रामगृह येथे मुक्काम केल्यानंतर ते गुरुवारी सकाळी विमानाने मुंबईकडे रवाना झाले.
ते म्हणाले, आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा आम्ही निषेध केला. या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याविषयी आपण उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलणार आहे. याशिवाय मनोज जरांगे यांच्या भावना जाणून घेतल्या असता, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्रे दिले जाते. मराठवाड्यातही अनेकांकडे खासरा दाखल्यावर कुणबी अशी नोंद आहे. कुणब्याप्रमाणेच आमचाही शेती व्यवसाय आहे. मग, आम्हाला आरक्षण का दिले जात नाही, अशा भावना त्यांनी बोलून दाखविल्या.
टिप्पणी पोस्ट करा