ब्युरो टीम: ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी ‘गदर 2’, ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटांवर टीका करून नवा वाद ओढवून घेतला आहे. असे चित्रपट हिट होणं खूप त्रासदायक असल्याचं वक्तव्य त्यांनी एका मुलाखतीत केलं. त्यानंतर ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि ‘गदर 2’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आता अभिनेते नाना पाटेकर यांनी नसीरुद्दीन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नाना?
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नाना म्हणाले, “तुम्ही नसीर यांना विचारलंत का की त्यांच्यासाठी राष्ट्रवाद म्हणजे काय? माझ्या मते देशासाठी प्रेम दाखवणं म्हणजे राष्ट्रवाद आणि त्यात काहीच वाईट नाही. गदर हा त्याच प्रकारचा चित्रपट असल्याने त्यात तशाच पद्धतीचा कंटेट असेल. द केरळ स्टोरी हा चित्रपट पाहिला नसल्याने त्याबद्दल मी काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही.”
‘गदर 2’च्या दिग्दर्शकांची प्रतिक्रिया
‘गदर 2’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्याला आश्चर्यकारक असं म्हटलंय. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “नसीरुद्दीन शाह यांनी जे म्हटलं, ते मी वाचलं. ते वाचून मी आश्चर्यचकीत झालो. नसीर साहेब मला नीट ओळखतात आणि मी कोणत्या विचारसरणीचा आहे, हेसुद्धा त्यांना माहीत आहे. ते गदर 2 बद्दल असं बोलताना पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. मी हे सांगू इच्छितो की गदर 2 हा चित्रपट कोणत्याही समुदायाच्या विरोधात नाही किंवा तो कोणत्याही देशाच्या विरोधातही नाही.”
‘द काश्मीर फाइल्स’वर टीका करणाऱ्या नसीरुद्दीन शाह यांच्यावर भडकले विवेक अग्निहोत्री
“गदर या चित्रपटात फक्त राष्ट्रभक्ती आहे. हा एक मसाला चित्रपट आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून लोक हा चित्रपट पाहत आले आहेत. त्यामुळे मी नसीर साहेबांना हे सांगू इच्छितो की जेव्हा ते गदर 2 हा चित्रपट पाहतील, तेव्हा ते नक्की त्यांचं वक्तव्य बदलतील. मला अजूनही हेच वाटतं की ते अशा गोष्टी बोलू शकत नाहीत. मी त्यांच्या अभिनयाचा खूप मोठा चाहता आहे. जर त्यांनी असं म्हटलं असेल तर मी त्यांनी विनंती करतो की त्यांनी एकदा हा चित्रपट पहावा. मी कधीच डोक्यात कोणताही राजकीय प्रचार ठेवून चित्रपट बनवला नाही आणि नसीर साहेबांना हे माहीत आहे”, असंही ते पुढे म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा