ब्युरो टीम: राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी दिल्लीत जय्यत तयारी सुरू आहे. या परिषदेपूर्वी PM मोदींनी एका मुलाखतीत देशाच्या अर्थव्यवस्थेसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
यावेळी त्यांना विचारण्यात आले की, 'तुम्ही 72 वर्षांचे आहात, या वयातही तरुणांना लाजवेल, अशी तुमची उर्जा आहे. इतकी उर्जा तुम्हाला कुठून मिळते?' यावेळी पीएम मोदींनी महत्त्वाकांक्षा आणि ध्येय, यातील फरक स्पष्ट करून प्रतिसाद दिला.
मनी कंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी म्हणाले, जगभरात असे अनेक लोक आहेत, जे एका मिशनसाठी आपली ऊर्जा, वेळ आणि संसाधने वापरतात. या बाबतीत मी एकटा किंवा अपवादात्मक आहे, असे नाही. राजकारणात येण्यापूर्वी अनेक दशके मी समाजात तळागाळात, लोकांमध्ये सक्रियपणे काम करत होतो. या अनुभवाचा एक फायदा असा झाला की, मी अनेक प्रेरणादायी लोकांना भेटलो, ज्यांनी स्वतःला एका कारणासाठी पूर्णपणे समर्पित केले. त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो.
महत्वाकांक्षा आणि ध्येय यात काय फरक?
यावेळी मोदींनी महत्त्वाकांक्षा आणि ध्येय, यातील फरक स्पष्ट केला. पीएम मोदी म्हणाले, जेव्हा एखादा व्यक्ती महत्त्वाकांक्षेपोटी काम करतो, तेव्हा त्याला आलेले कोणतेही चढ-उतार त्रास देऊ शकतात. कारण महत्त्वाकांक्षा ही पद, सत्ता, सुखसोयी इत्यादींच्या आसक्तीतून येते. पण जेव्हा कोणी एखाद्या मिशनसाठी काम करतो, तेव्हा त्याचा वैयक्तिक फायदा नसतो, त्यामुळे चढ-उतारांचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. एखाद्या मिशनसाठी समर्पित असणे हा अंतहीन आशावाद आणि उर्जेचा स्त्रोत आहे. शिवाय, अनावश्यक गोष्टींपासून अलिप्ततेची भावना येते, जी महत्त्वाच्या गोष्टींवर पूर्णपणे ऊर्जा केंद्रित करण्यास मदत करते.
पीएम मोदींचे मिशन काय आहे?
या विशेष मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, माझ्या देशाच्या आणि माझ्या लोकांच्या विकासासाठी काम करणे, हे माझे ध्येय आहे. यामुळेच मला सतत खूप ऊर्जा मिळते. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मी याआधीही सांगितले होते की, गुजरातचा मुख्यमंत्री होण्यापूर्वीही मी एका सामान्य माणसाप्रमाणे भारतातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आलो होतो. कठीण जीवन जगणाऱ्या लोकांची लाखो उदाहरणे मी प्रत्यक्ष पाहिली आहेत. मोठ्या संकटातही त्यांचा दृढनिश्चय आणि आत्मविश्वास मी पाहिला आहे.
एक मजबूत व्यासपीठ तयार करणे हे माझे ध्येय आहे
माझा ठाम विश्वास आहे की, आपल्या देशात भरपूर क्षमता आणि जगाला ऑफर करण्यासारखे खूप काही आहे. आपल्या लोकांना फक्त एका व्यासपीठाची गरज आहे, जिथून ते चमत्कार घडवू शकतील. असे मजबूत व्यासपीठ तयार करणे हे माझे ध्येय आहे. हे मला सर्व वेळ प्रेरित ठेवते. एखादी व्यक्ती वैयक्तिक पातळीवर एखाद्या मिशनसाठी समर्पित असते, तेव्हा निरोगी शरीर आणि मन राखण्यासाठी शिस्त आणि दैनंदिन सवयी आवश्यक असतात, ज्याची मी नक्कीच काळजी घेतो, असंही मोदी म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा