Pune : पुण्याचा दादा कोण,अशीच चर्चा सुरू असतानाच; कार्यक्रमाला वेळेवर येण्यावरून अजित पवार-चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली

 

ब्युरो टीम:  सरकारमध्ये दाखल झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. प्रशासकीय बैठका घेण्याचा धडाका त्यांनी लावला आहे.

त्यामुळे काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात धुसफुस सुरू आहे. त्यातच जिल्हा परिषदेच्या एका कार्यक्रमात दोघांमध्ये वेळेवर येण्यावरून चांगलीच जुंपली. यावेळी वेळेत येण्याचा सल्ला देत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना चिमटा काढला तर चंद्रकांत पाटलांनी केवळ मम म्हणून त्याला उत्तर दिले.

अजित पवार हे सरकारमध्ये आल्यापासून पुण्याचा दादा कोण, अशीच चर्चा सुरू झाली आहे. कारणही तसंच आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी भाजपचे चंद्रकांत पाटील आहेत. मात्र, ते जरी पालकमंत्री असले तरी अजित पवार हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असतात. काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महापालिका, पीएमआरडीएचे आयुक्त अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठका घेतल्या. या बैठकांना चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण नव्हतं. इतकेच नाहीतर, जिल्हा नियोजन समितीचा ३८२ कोटींचा मंजूर कामांचा आराखडाही अडकला गेला आहे. तर दोन दिवसांपूर्वीच लेखाशीर्ष २५-१५, १५-३८ अंतर्गत अजित पवार गटाच्या आमदारांना प्रत्येकी १० लाख रुपये दिल्याने या वादात आणखी भर पडली आहे. भाजप अन् शिंदे गटाचे नेते उपाशीच राहिले असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे वातावरण तापले असतानाच जिल्हा परिषदेने जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि अध्यक्ष चषक पुरस्कार व शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी, शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही निमंत्रित केले होते. शनिवारी सकाळी १० वाजता कार्यक्रम सुरू होणार होता. त्यासाठी सवयीप्रमाणे अजित पवार वेळेवर उपस्थित राहिले. मात्र, पालकमंत्री काही आलेच नाहीत. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर अजित पवार यांनी आयोजकांना कार्यक्रम सुरू करण्यास सांगितले.

अजित पवारांचे भाषण सुरू असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यावरून उपस्थितांना त्यांनी आरोग्याचे सल्ले दिले. आजकाल जीवनमान बदलले आहे. त्यामुळे वेळेत उठा, चांगल्या सवयी लावा, कामाला लवकर सुरुवात करा, कार्यक्रमाला वेळेत जायला शिका, असे ते म्हणाले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही अजित पवारांवर निशाणा साधला. ओरखडा न येऊ देता चिमटा काढायचा, असा अजित पवारांचा स्वभाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या सूचनेचं पालन करावं. पुढच्या काळात काय केलं पाहिजे, हे दादांनी सांगितले आहे तेच मलापण सांगायचं आहे. अजित पवारांच्या भाषणाला मम म्हणतो, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना उत्तर दिले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने