Raksha Khadse : रक्षा खडसे यांची भाजपसाठी सासऱ्यांविरुद्ध निवडणूक लढण्याची तयारी पण ‘राष्ट्रवादीत जाणार नाही’

 

ब्युरो टीम: देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाच्या गोटात जबरदस्त हालचाली सुरु आहेत. प्रत्येक पक्षाकडून विविध मतदारसंघांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. या दरम्यान जळगावात रावेर मतदारसंघात आगामी काळात मोठा राजकीय ड्रामा बघायला मिळण्याची शक्यता आहे.

 जळगाव जिल्ह्यातील राजकारणात आगामी काळात राजकारणातील संघर्ष घरापर्यंत जाणार की काय? अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत मोठा दावा केला आहे. देशभरात पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत पक्षाने आदेश दिला तर आपण रावेर लोकसभेची जागा निवडू, असं सूचक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या जागेवर सध्या एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या खासदार आहेत.

रक्षा खडसे या सध्या भाजपात आहेत. तर एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात रावेरमध्ये दोघांनी लोकसभेची निवडणूक लढवली तर राजकीय रणांगणात सख्खे सासरे आणि सून आमनेसामने येऊ शकतात. दुसरीकडे रक्षा खडसे या रावेर लोकसभेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तसेच आपण या निवडणुकीत पुन्हा एकदा जिंकूनच येऊ, असा दावा त्यांनी केला आहे.

रक्षा खडसे नेमकं काय म्हणाल्या?

“रावेर लोकसभेचा इतिहास पाहिला तर सातत्याने या ठिकाणी भाजपचाच विजय होत आलाय. भविष्यातही ही जागा भाजपच जिंकणार आहे, असं म्हणत रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभेच्या जागेवर आपला दावा कायम ठेवला आहे. रावेर लोकसभेच्या जागेसाठी पक्षाने मला संधी दिली तर मी संधीचं सोनं करेन”, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

वेळ पडली तर आपण आपले सासरे एकनाथ खडसे यांच्यासमोर निवडणूक लढणार. निवडणुकीत कुठेही कमी पडणार नाही, असं म्हणत रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “इंडिया आघाडीने एकनाथ खडसेंना संधी दिली आणि पक्षाने मला संधी दिली तर त्या परिस्थितीला मी सामोरं जाणार”, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने