ब्युरो टीम: महायुतीचं काम करायचं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोण, यापेक्षा कोण नको आहे यादृष्टीने पावले पडणार आहेत, असा सूचक इशारा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह यांना दिला.
तसेच माण विधानसभा मतदारसंघातही तसेच होईल. माण पाकव्याप्त काश्मिर आहे का ? असा सवालही त्यांनी केला
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मुख्य इमारतीत आयोजित पत्रकार परिषदेत रामराजे बोलत होते. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, युवराज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, '१० सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा जिल्ह्यात येत आहेत. शिरवळला त्यांचे स्वागत होणार असून कऱ्हाडला महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन ते कोल्हापूरला जाणार आहेत. अजित पवार यांच्या कामाचा झपाटा सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मोहळ त्यांच्याजवळ असते. आताही स्वागताला मोठ्या संख्येने कार्यकर्ते येतील. जिल्ह्यात राष्ट्रवादीची बांधणी सुरू असून आमदार मकरंद पाटील आणि मी लक्ष ठेवून आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी करणार का ? पत्रकारांच्या या प्रश्नावर रामराजे म्हणाले, आताची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. महायुतीत आम्ही आहोत. मतदारसंघाचा उमेदवार ठरला असेल तर माहीत नाही. पण, निवडणुकीत उमेदवार कोण यापेक्षा कोण नको हे माहीत आहे, असे स्पष्ट करत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना यातून एकप्रकारे इशाराच दिला आहे.
पोलिस बघतील कोण निंबाळकर ते ?
फलटण तालुक्यातील नंदकुमार ननावरे यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर रामराजेंनी मला यात गाेवू नका असे स्पष्ट करीत यातील 'निंबाळकर' कोण आहेत ते पोलिस बघतील असे सांगितले. तसेच खासदार रणजितसिंह यांच्याबद्दल मी मोठ्या नेतृत्वाबद्दल बाेलू शकत नाही. त्यांच्याकडे कर्तृत्व आहे. ते बुध्दीमान आहेत, असा टोलाही लगावला.
टिप्पणी पोस्ट करा