ब्युरो टीम: वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यासाठी टीम इंडिया सज्ज झाली असून एडिडासने वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचं एंथम लाँच केलं आहे. यात खेळाडू नव्या जर्सीत दिसत आहेत
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा 12 वर्षानंतर भारतात होत आहे. 2011 मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर दोन वनडे वर्ल्डकपमध्ये पदरी निराशा पडली. तसेच गेल्या दहा वर्षात भारताने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे दहा वर्षांचा दुष्काळ संपवण्याची नामी संधी आहे. या स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासाठी टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे. दुसरीकडे, टीम इंडियाचा स्पॉन्सर असलेल्या एडीडासने नव्या जर्सीसह एंथम लाँच केली आहे. यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह इतर खेळाडू नव्या जर्सीत दिसत आहेत. जर्सीचा रंग ब्लू असला तरी यात काही बदल दिसत आहेत. हा बदल क्रीडाप्रेमींच्या पटकन लक्षात आला आहे. जर्सीच्या खांद्यावर तीन पांढऱ्या पट्ट्या होत्या. आता ही जागा तिरंगी पट्ट्यांनी घेतली आहे.
टीम इंडियाच्या जर्सीत काय बदल?
टीम इंडियाचा प्रायोजक ड्रीम 11 असला तरी आयसीसी स्पर्धेत जर्सीच्या दर्शनी भागावर फक्त इंडिया लिहिलेलं असणार आहे. तर खांद्यावर असलेल्या तीन पांढऱ्या पट्ट्या आता तिरंगी झाल्या आहेत. दुसरीकडे, बीसीसीआयने टीम इंडियाच्या अधिकृत जर्सीचं अनावरण केलेलं नाही. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने इंडिया ऐवजी भारत हे नाव ठेवावं अशी सूचना केली होती. यात काही बदल दिसतो का? याबाबत उत्सुकता आहे. टीम इंडियाच्या अधिकृत जर्सीचं अनावरण 20 सप्टेंबरला रात्री 8 वाजता होणार आहे.
तिसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकण्याचा विश्वास
भारताने दोन वेळा वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकली आहे. पहिल्यांदा कपिल देव याच्या नेतृत्वात 1983 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात 2011 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात वनडे वर्ल्डकप जिंकेल, अशी क्रीडाप्रेमींना आशा आहे. या आधारावर एडिडासने एंथम थीम तयार केली आहे. सोशल मीडियावर हे गाणं येताच अवघ्या काही तासातच युजर्सच्या पसंतीस उतरलं आहे.
आशिया कप 2023 स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत जेतेपदावर नाव कोरलं आहे. या स्पर्धेतील खेळाडू वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार आहेत. केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांना लय सापडली आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी करतील अशी आशा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.
वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुबमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकुर.
टिप्पणी पोस्ट करा