World Cup 2023 : अश्विनचं वर्ल्डकपचं तिकिट निश्चित ? अक्षर, शार्दुलपैकी एकाची होणार सुट्टी

 

ब्युरो टीम :  ऑस्ट्रेलियाविरोधात मायदेशात सुरु असलेल्या वनडे मालिकेत  आर. अश्विन  याने दमदार कामगिरी केली. अक्षर पटेल  दुखापतग्रस्त झाल्यामुळे अश्विनला संधी देण्यात आली होती.

पण आता अश्विन याने विश्वचषकाच्या संघाचेही दार ठोठावले आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात अश्विनने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधळेय. पहिल्या वनडे सामन्यात अश्विनने दहा षटकात 41 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली होती. तर दुसऱ्या वनडे सामन्यात अश्विनने 7 षटकात 41 धावांच्या मोबदल्यात आघाडीच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. डेविड वार्नर  याच्यासह सर्वच डावखुरे फलंदाज अश्विनपुढे संघर्ष करताना दिसले.

अश्विन वर्ल्ड कप टीमचा भाग होणार?

ऑस्ट्रेलियाविरोधात दमदार कामगिरी केल्यानंतर आर. अश्विनला विश्वचषकाचे तिकिट मिळणार का? अश्विनने विश्वचषकातील आपले स्थान पक्के केलेय का? आशिया चषकात अश्विन भारतीय संघाचा भाग नव्हता. पण अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला अन् अश्विनचे नशीब बदलले. अश्विनला मायदेशात होणाऱ्या तीन सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघात सामील करण्यात आले. अश्विनने निवड समितीला निराश केले नाही. अश्विनकडे तगडा अनुभव आहे. त्याशिवाय त्याचे आकडेही बरेच काही बोलतात. अश्विन हा डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध अत्यंत प्रभावी पर्याय ठरतो. त्याचबरोबर कुलदीप यादवला स्पिनर म्हणून भारताच्या विश्वचषक संघात स्थान मिळाले आहे. मात्र, याशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजा असेल. अक्षर पटेलच्या फिटनेसवर प्रश्न कायम आहेत. अक्षर पटेल तंदुरुस्त झाला नाही तर अश्विनचे स्थान निश्चित मानले जातेय.

अक्षर पटेल की शार्दुल ठाकुर कुणाचा पत्ता कट होणार ?

भारताच्या विश्वचषक संघात एकही ऑफस्पिनर नाही. अशा परिस्थितीत ऑफस्पिनर म्हणून संघ व्यवस्थापनासमोर सध्या आर. अश्विन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे अश्विन विश्वचषक संघाचा भाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्विन संधी दिली तर अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांच्यापैकी एकाचा पत्ता कट होऊ शकतो. सध्याची स्थिती पाहता अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांच्यापेक्षा अश्विनला टीम मॅनेजमेंट प्राधान्य देऊ शकते.

अश्विनचे वनडे करियर

अश्विनने भारतासाठी 115 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 115 सामन्यांमध्ये रवी अश्विनने 4.95 च्या इकॉनॉमी आणि 33.2 च्या सरासरीने 155 विकेट घेतल्या आहेत. २५ धावा देऊन चार विकेट, ही अश्विनची वनडेतील सर्वोच्च बॉलिंग फिगर आहे. त्याशिवाय गरज पडल्यास अश्विन फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. अश्विनने वनडेमध्ये 86.96 च्या स्ट्राइक रेटने आणि 16.44 च्या सरासरीने 707 धावा केल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने