ब्युरो टीम : सीओईपी विद्यापीठ मैदानावर आयोजित कार्यक्रमात पुणे महानगरपालिका क्षेत्रात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांसाठी राबवण्यात आलेल्या लॉटरी योजनेमधील विजेत्या मिळकत धारकांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. यावेळी पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वर्तुळाकार महामार्गाचं काम लवकर सुरू व्हावं आणि मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील कामे गतीनं पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, असं उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांनी प्रतिपादन केलं.
शहराचा विकास करण्यासोबत शहर सुंदर आणि हिरवंगार रहावं यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शहराचा नियोजनबद्ध विकास करून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. नदीसुधार प्रकल्पाचा पहिला टप्पा ९ किलोमीटर क्षेत्रात सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना नदीच्या दोन्ही तटावर फिरण्यासाठी चांगली सुविधा मिळणार आहे. या परिसरात झाडं लावण्यात येणार आहेत. पुढील ५० वर्षाचा विचार करून विकासकामं करण्यात येत आहेत. कचरा संकलनासाठी पर्यावरणपूरक विद्युत वाहनं घेण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी देखील विद्युत बसेस घेण्यात आल्या आहेत. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त करण्याच्या या प्रयत्नांना नागरिकांनीही प्रतिसाद द्यावा, असं आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलं.
नागरिकांनी वेळेत मिळकतकर भरावा यासाठी प्रोत्साहन म्हणून १ कोटी रुपयांची ४५ बक्षिसं देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत ६ लाख ६० हजार ७८५ मिळकत धारकांनी मुदतीत कर भरला. त्यामुळे मिळकतकर संकलनात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ३०० कोटींपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. यामुळे महापालिकेमार्फत नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देता येतील. इतरही महानगरपालिकांनी अशा स्वरूपाचा उपक्रम राबवावा, असं आवाहन यावेळी केलं.
याबरोबरच १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत पुणे महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या निधीतून घनकचरा व्यवस्थापनासाठी खरेदी केलेल्या १० विद्युत वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. या वाहनांच्या मदतीनं एका फेरीत १.५ ते २ टन कचऱ्याची वाहतूक होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा