Chandrshekhar Bavankule : इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाच्या भूमिकेवरुन बावनकुळेंची शरद पवारांवर टीका

 

ब्युरो टीम : इस्रायल पॅलेस्टाईन वादावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या विधानावरुन भाजपा नेते संतापले आहेत. भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनीही शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

तर, केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करु नका, तर दहशतवादाचा तीव्र शब्दात धिक्कार करा असा विनंतीपर खोचक सल्ला फडणवीसांनी दिला आहे. आता, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शरद पवारांना प्रत्युत्तर देताना, मतांच्या राजकारणासाठी ते दहशतवाद्यांचं समर्थन करत असल्याचं म्हटलं आहे.

इस्रायल-हमास युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला पाठिंबा दर्शविला आहे. नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर बोलून भारत इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे, असा संदेश दिला आहे. परंतु, देशातील काही संघटना आणि विरोधी पक्षांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडली. तर, मोदींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर, भाजपाने नेत्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांच्या विधानावर पलटवार करत, निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर थेट टीका करताना, शरद पवार यांच्याकडून दहशतवाद्यांचं समर्थन करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात बावनकुळे यांनी केला आहे. इस्रायल-हमास-पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धावर भाष्य करताना, मतांच्या राजकारणासाठी शरद पवार दहशतवाद्यांचं समर्थन करतात, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले की, ज्या भागात युद्ध सुरू आहे ती जमीन ही पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथं अतिक्रमण झालं आणि इस्रायल देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचं नाही. परंतु, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी या सर्वांची पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका होती. दुर्दैवाने आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) इस्रायलची बाजू घेतली. ते करत असताना त्या जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. त्यांची भूमिका काहीही असो, परंतु, आपली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्वच्छ असली पाहिजे असं त्यांनी म्हटलं. शरद पवारांच्या या विधानावरून भाजपानं पलटवार सुरू केला आहे.

फडणवीसांचाही पलटवार

इस्त्रायल-पॅलेस्टाईन वादात भारताने आपली भूमिका कधीच बदलली नाही. मात्र, त्याचवेळी भारताने दहशतवाद, मग तो कुठल्याही स्वरुपात आणि कुणाच्याही विरोधात असो, त्याला कायमच कडाडून विरोध केला आहे. इस्त्रायलमध्ये जेव्हा निष्पाप लोक मारले जातात, तेव्हा संपूर्ण जगाने त्याची कडाडून निंदा केली. तसाच निषेध भारतानेही केला असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या विधानावर दिले आहे.

२६/११ च्या हल्ल्याची आठवण

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध करायला हवे. कारण, दहशतवादी हल्ल्याच्या यातना मुंबईने अधिक सोसल्या आहेत. विशेषत: २६/११ च्या वेळी मुंबईने अनेक नागरिक गमावले. त्यामुळे केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करु नका, तर दहशतवादाचा तीव्र शब्दात धिक्कार करा अशी शरद पवार यांना विनंती आहे असा खोचक सल्ला त्यांनी दिला आहे.



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने