ब्युरो टीम: भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे आहेत ते म्हणजे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. 1961 साली गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाले. तब्बल 450 वर्ष पोर्तुगीजांचे राज्य गोव्यावर होते.
गोव्याच्या संस्कृतीवर आजही पोर्तुगीजांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. गोव्याचा मुख्य उद्योग म्हणजे पर्यटन. ज्याप्रमाणे गोव्यातील समुद्र, समुद्रकिनारे, वनराई, पहाण्यासारखे आहेत तसेच गोव्यातील किल्ल्यांना सुद्धा तुम्हाला भेट द्यायला आवडेल.
डोंगरकपारीने वेढलेल्या या राज्यांत तब्बल 42 किल्ल्यांची नोंद झालेली आहे. तसे पाहता महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यातील किल्ले फारच लहान आहेत मात्र गतकाळातील संकृती, राजकारण, अर्थव्यवस्थेचे ते उत्तम नमुने आहेत.
गोव्यातील या किल्ल्यांपैकीच काही महत्वाच्या आणि प्रसिद्ध किल्ल्यांविषयी (Forts in Goa) आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गोव्यातील किल्ल्यांची माहिती – Famous Forts in Goa
अग्वाद किल्ला – Aguada fort
उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देश तालुक्यात हा किल्ला स्थित आहे. गोव्यातील पोर्तुगीज कारभाराचं सत्ताकेंद्र राहिलेला एक भव्य आणि प्रसिद्ध असलेला अग्वाद किल्ला.1609 मध्ये हा कील्ला बांधण्यास सुरुवात झाली. पाच वर्षे बांधकाम सुरु राहून1612 मध्ये हा किल्ला पूर्ण झाला. डचांनी जेव्हा समुद्रमार्गे येऊन गोव्यावर आक्रमण केले होते तेव्हा इतर दोन किल्ल्याच्या माध्यमातून पोर्तुगीजांनी डच जहाजांसोबत कसाबसा मुकाबला केला पण पोर्तुगीज अपयशी ठरले. डच गोव्याची प्रचंड लुट करून निघून गेले. गोव्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अग्वाद किल्ल्याचा जन्म झाला. या किल्ल्यावरून चारही बाजूला नजर ठेवता येते. किल्ल्याचा मुख्य उपयोग पाणी व दारुगोळा साठविण्यासाठी केला जात असे. आशिया खंडातील सर्वात जुना समजण्यात येणारा दीपगृह या किल्ल्यावर आहे. 1864 साली तो बांधण्यात आला होता. अग्वाद किल्ला हा 400 वर्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात होता.
शापोरा किल्ला – Chapora fort
उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देश तालुक्यात हा किल्ला आहे. गोव्यातील लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक शापोरा किल्ला आहे. बार्देश प्रांताला उत्तरेकडून मुस्लीम सत्ता, पूर्वेकडून मराठे आणि स्थानिक शत्रूंचा धाक होता. याच कारणामुळे पोर्तुगीजांनी 1617 मध्ये शापोरा किल्ल्याचे निर्माणकार्य सुरु केले. हा किल्ला बऱ्याचवेळा वेगवेगळ्या सत्तांच्या ताब्यात गेला. 1684 मधे मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता. पुढे परत पोर्तुगीजांनी तो आपल्या ताब्यात घेतला. 1882 मध्ये पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा वापर कायमचाच बंद केला. किल्ला आज अवशेषरुपात शिल्लक आहे मात्र अजूनही किल्ल्याची सर्व बाजूने असणारी भक्कम तटबंदी, पोर्तुगीज शैलीचे बुरुज आणि सुस्थितीत असणारा दरवाजा आजही पाहण्यासारखा आहे. किल्ल्यावरून समुद्राचे सुंदर रूप तुम्हाला अनुभवता येते. बॉलीवूडमधील ‘दिल चाहता है’ या चित्रपटातील एका दृश्यात हा किल्ला आपल्याला पहायला मिळतो. या चित्रपटापासून हा किल्ला अधिकच प्रसिद्धीस आला.
कोर्जूएम किल्ला – Corjuem fort
उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देश तालुक्यातील हळदोने गावाजवळ, म्हापसा नदीच्या किनाऱ्यावर एका छोट्या बेटावर हा किल्ला इ.स. 1550 मध्ये बांधण्यात आला होता. पणजीच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला आणखी बळकट करण्यात आला. या छोटेखानी किल्ल्याला चार बुरुज आहेत. किल्ल्यात एक विहीर आहे पण ती आता लोखंडी जाळी टाकून झाकण्यात आली आहे. किल्ल्याची तटबंदी रुंद असून अनेक ठिकाणी ठराविक अंतरावर तोफा डागण्यासाठी चौकोनी खाचा केल्या आहेत. आतमध्ये पोर्तुगीज भाषेतील एक शिलालेखदेखील आपल्याला पाहायला मिळतो. गोवा सरकारने हा किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. कोर्जूएम किल्ला म्हापसा शहरापासून 14 कि.मी. अंतरावर आहे.
राशोल किल्ला – Rachol fort
दक्षिण गोव्यातील साल्सेत तालुक्यात मडगावच्या ईशान्येस साधारण 5 कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. आता या किल्ल्याचे काही थोडेफार अवशेष शिल्लक आहेत. त्यामध्ये किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि खंदक आपल्याला दिसतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आपला राशोल गावात प्रवेश होते. मुस्लीम बहामनी साम्राज्यात हा किल्ला बांधण्यात आला. पुढे हा किल्ला आदिलशहाकडे गेला. राजा कृष्णदेवराय याने आदिलशहाकडून तो आपल्या ताब्यात घेतला. पुढे तो पोर्तुगीजांकडे आला. नंतर तो शेवटपर्यंत पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला.
काबो डी रामा किल्ला – Cabo De Rama fort
गोव्याच्या दक्षिण जिल्ह्यातील मडगाव स्टेशन पासून 27 कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते कि, किल्ल्याचा संबध रामाशी असला पाहिजे.एका आख्यायिकेनुसार राम जेव्हा 14 वर्षांच्या वनवासासाठी गेले असता, या ठिकाणी त्यांनी काही काळ घालवला होता असे म्हणतात. हा किल्ला गोव्यातील स्थानिक राज्यकर्त्यांनी बांधला आहे. इ.स.1763 मध्ये तो पोर्तीगीजांनी आपल्या ताब्यात घेतला. 1792 मध्ये पोर्तुगीजांकडून इग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. किल्ल्यावर तुम्हाला सैनिकांसाठी केलेल्या देवड्या, ठराविक अंतरावर असणाऱ्या तोफा दिसून येतात. या किल्ल्यावर जवळपास 21 तोफा आहेत. किल्ल्याची तटबंदी, बुरुज, खंदक मजबूत आहेत. किल्ल्यावरून जंगल, टेकड्या आणि अथांग अशा समुद्राचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. किल्ल्यापासून जवळच शांत, सुंदर असा काबो डी रामा समुद्र किनारा (बीच) आहे.
मोरमुगाओ किंवा मुरगाव किल्ला – Mormugao Fort
गोव्याच्या दक्षिण जिल्ह्यात वास्को पासून 4 कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. मुरगाव बंदर हे खोल समुद्राचे नैसर्गिक बंदर आहे. व्यापारी जहाजे हा पोर्तुगीजांच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत होता. त्यामुळे गोव्यातील बंदरे सुरक्षित करणे त्यांना फार आवश्यक होते. बंदर सुरक्षित करण्यासाठीच त्यांनी 1624 मध्ये मुरगाव किल्ला बांधला. जवळपास 10 किलोमीटर परिसरात हा किल्ला विस्तारलेला आहे. किल्ला बांधल्यानंतर पोर्तुगीजांनी जुन्या गोव्याहून आपली राजधानी मुरगाव येथे हलवली होती. 17 व्या शतकात मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. त्यांनी या किल्ल्याच्या मूळ तटबंदीचे नूतनीकरण केले होते. त्यानंतर परत तो पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला असा किल्ल्याचा इतिहास आहे. किल्ल्यात उंच तटबंदी, तुरुंगातील पाच तुकड्या, आणि चौकशीसाठी निवास व्यवस्था होती. या किल्ल्यावर 53 तोफा होत्या. राजा डोम फिलीफ आणि डोम फ्रान्सिस्को द गामा यांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला बांधण्यात आला आहे. असे तेथील शीलालेखावरून स्पष्ट होते. आजही हा किल्ला येथील बंदराचा पहारेकरीच आपल्याला भासतो. निसर्गसौदर्य प्रेमी आणि ऐतिहासिक प्रेमी यांना हा किल्ला नक्कीच आवडेल.
रिस मागोस किल्ला – Reis Magos fort
उत्तर गोव्यात कलंगुट ते पणजी रोडवर एका टेकडीवर हा किल्ला बांधलेला आहे. नेरूळ नदीच्या पुलावरून रिस मागोस या गावाकडे जाण्याचा रस्ता आहे. असे म्हटल्या जाते कि, सन 1495 मध्ये आदिलशहाने या किल्ल्याची निर्मिती केली होती. कॅन्डोलीम-नेरूळ-रीस मागोस गाव असा 3-4 किमी चा रस्ता आपल्याला या किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जातो. या गावाजवळच किनाऱ्याच्या अलीकडे एका टेकडीवर हा किल्ला बांधण्यात आला. हा किल्ला सुरवातीला व्हाइसरॉयचे निवासस्थान म्हणून वापरत असत मात्र नंतर त्याचे किल्ल्यात रुपांतर करण्यात आले. 1798 मध्ये हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. किल्ल्याच्या खूप उंच भिंती, टेहळनी बुरुज वैशिष्टयपूर्ण बांधले आहे. या किल्ल्यावर शत्रूला रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 33 तोफा आहेत. जवळच असलेल्या रिस मागोस चर्चने किल्ल्याच्या सौंदर्यात भरच घातली आहे. या किल्ल्यावरून परिसराचे अत्यंत सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. गोव्यात बाहेरून येणाऱ्या भारतीयांसोबतच विदेशी पर्यटकांचेही हे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.
गोव्यातील काही महत्वाच्या किल्ल्यांचा थोडक्यात इतिहास आणि इतर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासोबतच गोव्यातील इतरही काही किल्ल्यांची नावे आम्ही देत आहोत.
गोव्यातील काही इतर किल्ले – List of Forts in Goa
तेरेखोल किल्ला.
नानुज किल्ला.
पोंडा किल्ला.
इस्तेंव किंवा जुवे किल्ला.
कोळवले किल्ला.
अंजेदिवा किल्ला.
बेतुल किल्ला.
अलोर्ना किंवा हळर्ण किल्ला.
गंडलीएम किल्ला.
टिप्पणी पोस्ट करा