Grampanchayat Election : राज्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर; २ हजार ३६९ ग्रामपंचायतींमध्ये धुराळा उडणार


ब्युरो टीम : पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत असताना ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा लवकरच उडणार आहे. तसे महत्त्वाचे अपडेट्स राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदांच्या तसेच सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी मतदान होणार आहे.

राज्यभरातील सुमारे २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होईल.

पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुका का रखडल्या आहेत?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मात्र, त्यापूर्वी ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्याने, अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता. जाहीर झालेल्या ९२ नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्येही ओबीसी आरक्षण लागू करावे, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली. तसेच मविआ काळात तयार करण्यात आलेली वॉर्डरचना बदलण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला होता. या नव्या वॉर्ड रचनेलाही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने