ICC ODI World Cup 2023 : बांग्लादेशच्या २५६ धावा; दोघांची अर्धशतके; भारताला चांगल्या सुरवातीची अपेक्षा

 

 

ब्युरो टीम : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आज बांगलादेशविरुद्ध चांगला मारा केला. बांगलादेशच्या सलामीवीरांनी ९३ धावांची भागीदारी केल्यानंतर मोठी धावसंख्या उभी राहिल असे वाटले होते, परंतु कुलदीप यादव, रवींद्र जडेजा यांनी दणके दिले.

त्यानंतरअन्य गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना बांगलादेशच्या धावांचा ओघ आटवला. हार्दिक पांड्याची  दुखापतीने मात्र टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले आहे.

तनझीद हसन ( ५१) व लिटन दास ( ६६) यांनी ९३ धावांची भागीदारी करतना वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशसाठी मागील २४ वर्षांतील सर्वोत्तम सलामी करून दिली. कुलदीप यादवने पहिला धक्का देताना हसनला पायचीत केले. पाठोपाठ जडेजाने नजमूल होसैन शांतोला ( ८) पायचीत केले. २४व्या षटकात मोहम्मद सिराजने मेहिदी हसन मिराजला ( ३) झेलबाद केले. लोकेश राहुलने अफलातून झेल घेतला. जडेजाने सेट फलंदाज दासला ६६ धावांवर झेलबाद केले. अनुभवी मुश्फिकर रहिम आणि तोवहीद हृदय यांनी बांगलादेशचा डाव सावरताना पुन्हा सरासरी सुधारली होती. या दोघांची ४२ धावांची भागीदारी शार्दूलने ३८व्या षटकात हृदयला ( १६) माघारी पाठवून तोडली.

बुमराहला त्याच्या सातव्या षटकात पहिली विकेट मिळाली. रहिमचा ( ३८) अफलातून झेल जडेजाने टिपला. जडेजाने १०-०-३८-२ अशी स्पेल टाकली. कुलदीपनेही ४७ धावांत १ विकेट घेतली. शार्दूल ठाकूर आजही महागडा ठरला. बांगलादेशच्या नसून अहमद व महमदुल्लाह यांनी शेवटच्या षटकांत चांगली फटकेबाजी करताना २५ चेंडूंत ३२ धावांची भागीदारी केली. नसूनला बाऊन्सरवर ( १४) बाद करून सिराजने आजच्या सामन्यातील दुसरी विकेट घेतली. महमदुल्लाहने खणखणीत फटकेबाजी करताना ३६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावा करून बांगलादेशला ८ बाद २५६ धावांपर्यंत पोहोचवले. सिराजने ६० धावा देताना २ विकेट्स घेतल्या

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने