ICC ODI World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया २०० च्या आत; भारतीय गोलंदाजांसमोर टाकली नांगी

 

ब्युरो टीम : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या त्यांच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मजबूत पकड घेतली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी काही काळासाठी ऑसींना आधार दिला होता.

पण, रवींद्र जडेजाने ३ विकेट्स घेत भारताला फ्रंटसीटवर आणून बसवले. कुलदीप यादव ( २-४२) आणि आर अश्विन ( १-३४) यांनीही कमाल केली. भारतीय फिरकी माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियन्स सपशेल अपयशी ठरले. जसप्रीत बुमराहनेही २ विकेट्स घेतल्य

मिचेल मार्श भोपळ्यावर माघारी परतल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑसींचा डाव सावरला होता. पण, कुलदीप यादवने ही जोडी तोडली आणि त्यानंतर रवींद्र जडेजाने कमाल केली. वॉर्नरने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रम नावावर केला. स्मिथ व वॉर्नर यांनी ६९ धावांची भागीदारी केली. वॉर्नर ५२ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ४१ धावांवर बाद झाला. स्मिथ व मार्नस लाबुशेन जोडी सेट होऊ पाहतच होती की रवींद्र जडेजाने विकेट घेतली. स्मिथ ७१ चेंडूंत ५ चौकारांसह ४६ धावांवर माघारी परतला अन् लाबुशेनसह ३६ धावांची भागीदारी तुटली. जडेजाने त्याच्या पुढच्या षटकात लाबुशेन ( २७) आणि ॲलेक्स केरीला बाद केले. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ११९ धावांत माघारी परतला. जडेजाने यापैकी ३ विकेट्स घेतल्या.

ग्लेन मॅक्सवेल व कॅमेरून ग्रीन यांनी सावध पवित्राच स्वीकारला आणि भारतीय फिरकीपटूंचा ते संयमाने सामना करताना दिसले. यावेळी दोघांनी धावांच्या सरासरीपेक्षा विकेट टिकवण्यावर भर दिला होता. पण, कुलदीपने ऑस्ट्रेलियाला मोठा झटका देताना मॅक्सवेलचा ( १५) त्रिफळा उडवला आणि त्यापाठोपाठ आर अश्विनने ग्रीनला ( ८) माघारी जाण्यास भाग पाडले. कुलदीपने १०-०-४२-२ अशी स्पेल टाकली. जसप्रीतने सामन्यातील दुसरी विकेट घेताना कमिन्सला ( १६) माघारी पाठवले.

जडेजाच्या शेवटच्या षटकात अॅडम झम्पाचा झेल उडाला होता, परंतु प्रयत्न करूनही रोहित तो नाही टीपू शकला. जडेजाने १०-२-२८-३ अशी अप्रतिम गोलंदाजी केली. अश्विननेही त्याच्या १० षटकांत एक निर्धाव षटकासह ३४ धावा देत १ विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १९९ धावांवर तंबूत परतला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने