ब्युरो टीम: भारताने २०२३ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली आहे. चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत प्रथम गोलंदाजी करत आहे.
जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शच्या रूपाने भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिलं. मिचेल मार्श खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या बुमराहने विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पहिली विकेट घेतली. त्यानंतर भारताच्या इतर गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पण बुमराहच्या बाबतीत मात्र एक अजब योगायोग घडला.
जसप्रीत बुमराहने 2023 च्या वर्ल्ड कप आधी 2019 मध्येही वर्ल्ड कप खेळला आहे. आपला पहिला एकदिवसीय विश्वचषक खेळताना बुमराहने 2019 मध्ये भारताच्या पहिल्याच सामन्यात पहिली विकेट घेतली होती. 2019 च्या विश्वचषकात भारताने आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आणि जसप्रीत बुमराहने हाशिम अमलाला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले होते. त्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ६ विकेट्सने पराभव केला होता. तसेच 2019 च्या विश्वचषकात टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली होती. पण त्यावेळी न्यूझीलंडकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.
दरम्यान, पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव १९९ धावांत भारताने गुंडाळला. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात करणाऱ्या मिचेल मार्शला बुमराहने माघारी पाठवले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात भागीदारी झाली. पण त्यानंतर त्यांना फारशी धावसंख्या उभारता आली नाही. रविंद्र जाडेजाने २८ धावांत सर्वाधिक ३ बळी टिपले. कुलदीप यादवने ४२ धावांत २ तर जसप्रीत बुमराहने ३५ धावांत २ गडी बाद केले. याशिवाय सिराज, हार्दिक आणि अश्विन या तिघांनी प्रत्येकी १-१ बळी मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४६ धावा आणि वॉर्नरने ४१ धावा केल्या. त्याखालोखाल मिचेल स्टार्कने २८ तर मार्नस लाबूशेनने २७ धावा केल्या.
टिप्पणी पोस्ट करा