ब्युरो टीम : मराठा आरक्षणासाठी उपोषण करुन राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष वेधणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सभा सध्या होत आहेत. 14 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे त्यांची विराट सभा झाली. या सभेत त्यांनी आरक्षणासाठी आणखी दहा दिवस सरकारला दिले. परंतु 24 ऑक्टोंबरनंतर आपण एक मिनिटही थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज एकवटला आहे. आता अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील सभा घेणार आहे. त्यासाठी जागा आणि तारीख निश्चित झाली आहे.
कधी अन् कुठे होणार सभा
मनोज जरांगे पाटील यांची सभा 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात पहिलीच सभा मनोज जरांगे पाटील घेत आहेत. त्यांच्या सभेची जागाही ठरली आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे या सभेची तयारी केली जात आहे. अंतरवली सराटीनंतर सरळ पुणे जिल्ह्यात जाहीर व्यासपीठावरुन मनोज जरांगे पाटील बोलणार आहे.
किती मोठी असणार जागा
मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना लाखोंची गर्दी होत आहे. अगदी मध्यरात्री किंवा पहाटे झालेल्या सभांनाही चांगली गर्दी झाली होती. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यात होणाऱ्या सभेला लाखोंची गर्दी होणार आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे 5 लाख मराठा बांधव राजगुरुनगर येथील सभेला येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या सभेसाठी 100 एकर जागा निश्चित केली आहे. या जागेची पाहणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पोलिसांनी केली.
आता काय मांडणार भूमिका
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत 14 ऑक्टोबर रोजी संपली. त्यानंतर पुन्हा दहा दिवसांची मुदत दिली. अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सरकाराला निर्वाणीचा इशारा दिला. मराठा आरक्षणाची विजययात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल असे वक्तव्य करत विजयादशमीपासून टोकाचे उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्यानंतर पुणे जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांची सभा होत असून त्यावेळी काय भूमिका मांडणार? याकडे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा