ब्युरो टीम : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. सातव्या टप्प्यापासून प्रत्येक सामन्यांचा निकाल हा उपांत्य फेरीसाठी मोठा उलटफेर करणारा असेल. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानातील थरार क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार आहे. असं असताना दुसरीकडे, राज्यात मराठा आरक्षणासाठीचा लढा आणखी तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई पुण्यात होणाऱ्या सामन्यांसाठी पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त ठेवत आहे. पुण्यात होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यातही पोलिसांनी असाच कडा पहारा ठेवला आहे. हा सामना पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक काळे कपडे परिधान करून आले होते. मात्र पोलीस आणि यंत्रणांनी त्यांना प्रवेश नाकारला. मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद वर्ल्डकप सामन्यात उमटू नयेत, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. काळे कपडव दाखवून याचा निषेध करू नये, यासाठी पाऊल उचललं जात आहे. यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या क्रीडाप्रेमींचा मात्र हिरमोड झाला आहे.
पोलिसांनी कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याने असं पाऊल उचलल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान सामन्यानंतर या मैदानात आणखी तीन सामने होणार आहेत. मराठा आरक्षणाचा तोडगा निघाला नाही तर प्रेक्षकांना पुढेही अशाच परिस्थितीला सामोर जावं लागू शकतं.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील स्टेजवर उभे असताना कोसळले.त्यांची प्रकृती ढासळल्याने तणावाचं वातावरण आहे. यावेळी उपस्थितांनी त्यांना पाणी पिण्याची विनंती केली.
1 नोव्हेंबरला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका सामना याच मैदानात आहे. 8 नोव्हेंबरला इंग्लंड आणि नेदरलँड यांच्यात याच मैदानावर सामना होणार आहे. 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील लढत येथेच होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा