Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी घेणार विशेष अधिवेशन ; राज्य सरकारची तयारी ?

 

ब्युरो टीम : मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून महाराष्ट्रभर आंदोलनं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार अॅक्टिव्ह मोडमध्ये आलं आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे, अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. या अधिवेशनात अध्यादेश काढला जाण्याची शक्यता आहे. आरक्षणासाठी सुरु असलेलं मराठा आंदोलन आता हिंसाचाराच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल वर्षा या निवासस्थानी बैठक झाली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनावर चर्चा झाली. काही ठिकाणी संचारबंदी लावण्यावरही या बैठकीत चर्चा झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे राजभवनावर दाखल झाले. तिथे राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली. मराठा आरक्षणाबाबत काय तोडगा काढता येईल यावर या बैठकीत चर्चा झाली. आता राज्यपाल रमेश बैस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत बातचित करणार आहेत. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून मार्ग निघतो हे पाहणं महत्वाचं असेल.

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. आमदारांची घरं जाळली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महालक्ष्मी रोड ते मरबार हिल वर्ष निवासस्थानी जाणाऱ्या मार्गावर दोन ते तीन ठिकाणी पोलिसांनी बॅरिगेट लावले आहेत.

यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून चप्पल ही भिरकवण्यात आली होती. याच अनुषंगाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाली आहे. मुंबई पोलिसांनी मरबाड हिल परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर वर्षा निवासस्थानी येणाऱ्या सर्व मार्गावर मोठ्या प्रमाणात बॅरिगेट लावून पोलिसांनी बंदोबस्त लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने