NCP Meeting : शरद पवारांचा आमदार राष्ट्रवादीच्या बैठकीला; अजित पवार गटाला बळ ?

ब्युरो टीम :   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठक आज होत आहे. या बैठकीत लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. मात्र एका व्यक्तीला या बैठकीत पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

आज कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीला त्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, अध्यक्ष फ्रंटलचे पदाधिकारी उपस्थित आहेत. उद्या दिंडोरी,अहमदनगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी व जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे.

शरद पवार यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीला शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंह नाईक हे देखील उपस्थित आहेत. मानसिंह नाईक यांनी अजित पवार गटाला समर्थन दिले होते. आता मानसिंह नाईक शरद पवारांच्या बैठकीसाठी आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पक्षात तयार झाले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील अनेक बड्या नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

अजित पवार गटाने आता पक्ष आणि पक्षचिन्ह देखील आमचंच असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादीतील पेचप्रसंगाबाबतची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु आहे. यावेळी आपल्यासोबत ४१ आमदार असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे.

मात्र अजूनही राष्ट्रवादीचे अनेक आमदार नेमके कुणासोबत आहेत, हे स्पष्ट होत नाही. त्यात मानसिंह नाईक यांच्या शरद पवारांच्या बैठकीतील उपस्थितीमुळे संभ्रम आणखी वाढला आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने