ब्युरो टीम : अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांचं आहे. नितीन गडकरी या नावाला भारतात जितका सन्मान आहे, तितकंच हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदरणीय आहे. अशा व्यक्तिमत्वाला जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. त्यावेळी नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र ही उत्सुकता टीझरमध्येही कायम राहिली आहे.
नितीन गडकरी त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच एक प्रगतशील भारत नावारूपास आला. या चित्रपटाच्या टीझरची सुरुवातच ”या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल, तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी…” या संवादाने होतेय. त्यामुळे त्यांची बांधिलकी ही केवळ राजकारणाशी नसून समाजकारणाशीही आहे, याचा प्रत्यय येतो. टीझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नितीन गडकरींचा हा जीवनपट प्रेक्षकांना येत्या 27 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात पाहता येणार आहे.
या चित्रपटाविषयी दिग्दर्शक अनुराग राजन भुसारी म्हणाले, ” नितीन गडकरी हे राजकारणातील एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर मला अनेकांचे फोन आले. अनेकांनी मला नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार असल्याचं विचारलं. मात्र ही उत्सुकता लवकरच दूर होईल. एक सर्वसामान्य कार्यकर्ता, समाजसेवक ते प्रमुख कॅबिनेट मंत्री हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच रंजक आहे. त्यांचं हे दुसरं जग जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. खासगी आयुष्यात नितीन गडकरी कसे होते आणि कसे आहेत, हे ‘गडकरी’मधून प्रेक्षकांना जाणून घेता येईल.”
टिप्पणी पोस्ट करा