Nitish kumar : नितीशकुमारांचा मास्टरस्ट्रोक? बिहारची जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीरज; पहा कुणाची किती टक्केवारी

 

ब्युरो टीम ; लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जबरदस्त मास्टरस्ट्रोक मारला आहे. नितीश कुमार यांनी बिहारमधील जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी (Caste Based Survey Report) जाहीर केली आहे. बिहार सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत सर्वाधिक संख्या अति मागासवर्गाची असल्याचं स्पष्ट झालं आहे. मागासवर्ग आणि अति मागासवर्गाची एकूण लोकसंख्या 63 टक्के आहे. तर यादव समाजाची लोकसंख्या 14 टक्के आहे. तर राज्यात ब्राह्मण फक्त चार टक्के आहेत. अनुसूचित जातीची लोकसंख्या 20 टक्के आहे.

गांधी जयंतीचं निमित्त साधून बिहार सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात सर्वाधिक आकडेवारी अति मागासवर्ग (ईबीसी)ची आहे. अति मागास वर्गाची संख्या 36.01 टक्के आहे. त्यानंतर मागास वर्गाचा (ओबीसी) नंबर लागतो. ओबीसींची राज्यातील संख्या 27.13 टक्के आहे. तिसऱ्या नंबरवर सामान्य वर्ग आहे. या वर्गाची लोकसंख्या 15.52 टक्के एवढी आहे.

यादव सर्वाधिक

बिहारमध्ये यादव समाजाची संख्या सर्वाधिक आहे. बिहारमध्ये यादव समाज एकूण 14 टक्के आहे. यादव समाजात ग्वाला, अहीर, घासी, सदगोप आणि मैहर आदी जातींचा समावेश करण्यात आला आहे. यादवानंतर बिहारमध्ये कुशवाहा (कोईरी) समाजाचा नंबर लागतो. कुशवाह समाजाची लोकसंख्या 4.21 टक्के आहे. तर ब्राह्मणांची लोकसंख्या 3.86 टक्के आहे. राजपूत समाजाची लोकसंख्या 3.45 टक्के तर मुसहर जातीची लोकसंख्या 3.08 टक्के आहे.

कुर्मी किती?

बिहारच्या राजकारणात कुर्मी जातीचं प्रचंड वर्चस्व आहे. या जातीची लोकसंख्या केवळ 2.87 टक्के आहे. तर बढई समाजाची लोकसंख्या 1.45 टक्के आहे. याशिवाय पासी समाजाची लोकसंख्या 0.98 टक्के असूनमल्लाह समाजाची लोकसंख्या 2.6 टक्के आहे. या जनगणनेनुसार बिहारमध्ये बनिया समाजाचे 2.3 टक्के लोक राहतात. कानू समाजाचे 2.6, नेनिया समाजाचे 1.9, कुंभार जातीचे 1.4 टक्के लोक राहत आहेत.

विरोधक चितपट

पुढच्या वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आपलं बळ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यापूर्वीच नितीश कुमार यांनी राज्यातील जातीनिहाय जनगणना जाहीर करून विरोधकांना चितपट केलं आहे. या आकडेवारीमुळे कोणत्या जातीचं राज्यात किती वर्चस्व आहे हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जातीची राज्यातील सत्ता आणि प्रशासनातील भागिदारीही निश्चित होणार आहे. त्यामुळे बिहारचं राजकीय समीरणच बदलून जाणार आहे. असं असलं तरी प्रत्येक जात समूहाला आपल्या जातीचा आकडा कळल्यामुळे या जातींच्या अस्मिता जागा होण्याची आणि त्या जातींचे नवे राजकीय पक्ष निर्माण होण्याची शक्यताही बळावली आहे.

कुणाची किती लोकसंख्या…

मुस्लिम (जुलाहा/अन्सारी)- 3.54%

प्रजापती (कुंभार)- 1.40%

कानू- 2.2%

तेली- 2.81%

शेख- 3.82%

दुसाध, धारी, धरही- 5.3%

धानुक- 2.1%

न्हावी- 1.59%


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने