OMG 2 : ‘ओह माय गॉड 2’ओटीटीवर; या प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

 

ब्युरो टीम : अभिनेता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याच दिवशी सनि देओल आणि अमिषा पटेल यांचा बहुचर्चित ‘गदर 2’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ला प्रचंड यश मिळत असतानाही ‘ओह माय गॉड 2’ने देशभरात शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला. अमित राय दिग्दर्शित या चित्रपटाचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून विशेष कौतुक झालं. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

ओटीटीवर प्रदर्शनाची तारीख

‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटातून अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सेक्स एज्युकेशनचं महत्व आणि त्याबद्दल असणाऱ्या गैरसमजुतींवरून पडदा उचलणाऱ्या या चित्रपटाला सुरुवातीला बऱ्याच आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं. उज्जैनमधल्या महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी चित्रपटावर बंदीची मागणी केली होती. इतकंच नव्हे तर सेंन्सॉर बोर्डाने चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र दिलं. त्यामुळे त्याचा प्रेक्षकवर्ग मर्यादित होता. आता जवळपास दोन महिन्यानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 8 ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. मंगळवारी सकाळी नेटफ्लिक्सने याबद्दलची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली.

अक्षय कुमारची प्रतिक्रिया

चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला, “‘ओह माय गॉड 2’ला थिएटरमध्ये मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून आम्ही थक्क झालो होतो. ही कथा आणखी बऱ्याच प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मद्वारे ते शक्य होऊ शकतं. हा चित्रपट मोठ्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचू शकतो.” या चित्रपटात अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्याशिवाय यामी गौतम धर, पवन मल्होत्रा, गोविंद नामदेव, विजेंद्र काला आणि आरुष वर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने