ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते अहमदनगर येथील निळवंडे प्रकल्पाचे जलपूजन करून लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.
त्यापूर्वी पंतप्रधानांनी शिर्डीत साई बाबा मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं. पाच वर्षांनी पंतप्रधान मोदी साई बाबांच्या दर्शनाला आले. पंतप्रधानांच्या हस्ते साईबाबांची आरती करण्यात आली. तसेच मंदिरातील नवीन दर्शन रांग कॉम्प्लेक्सचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
साईबाबांच्या दर्शनासाठी असलेले हे कॉम्प्लेक्स वातानुकूलित असून अत्याधुनिक सुविधा तेथे आहेत. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी तेथे एक उत्तम प्रतिक्षालयही आहे. विशेष म्हणजे दर्शन रांगेच्या या कॉम्प्लेक्सची पायाभरणी ही देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २०१८ साली झाली होती. आणि आज त्याच संकुलाचे उद्घाटनही पंतप्रधनांच्या हस्ते पार पडले.
निळवंडे धरणाच्या कालव्याचा लोकार्पण सोहळा
शिर्डीतील दर्शनानंतर पंतप्रधान मोदी हे निळवंडे धरणाचे जलपूजन आणि धरणाच्या कालव्याचे लोकार्पण करण्यासाठी रवाना झाले. या संपूर्ण परिसराची पंतप्रधानांनी स्वत: पाहणी केली. नंतर मान्यवरांच्या उपस्थिती पंतप्रधानांनी जलपूडन करून कालव्याचे लोकार्पण केले
या धरणाचे लोकार्पण हे जिल्ह्यातील लोकांसाठी ही एक अत्यंत दिलासादायक बाब आहे. 8.32 टीएमसी क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे अकोले संगमनेर राहता कोपरगाव या तालुक्यातील जवळपास 68 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मात्र हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 46 वर्षाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागली. पण इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रकल्प पूर्ण झाला असला तरी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र प्रकल्पातील पाण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. कारण अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना उजव्या कालव्याद्वारे पाणी मिळणार असून या कालव्याचं काम अपूर्ण आहे
कालव्याच्या लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. ‘नमो शेतकरी महासन्माम निधी’ योजनेची सुरूवात त्यांच्या हस्ते होणार असून ते शेतकरी मेळाव्यात नागरिकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला संबोधित करतील. त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा