Prithviraj Chavan : पुन्हा निवडून आल्यास विधानसभा निवडणुका नाही ; पृथ्वीराज चव्हाणाचा दावा

 

ब्युरो टीम : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीवरून मोठं विधान केलं आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाहीत, असा खळबळजनक दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांच्या दाव्याने खळबळ उडाली असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. महाविकास आघाडी एकत्रितपणेच लढणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राज्यात आमची तीन पक्षाची आघाडी आहे. आम्ही राज्यात एकास एक उमेदवार देण्यावर भर देणार आहोत. महाविकास आघाडी राज्यातील जागा वाटप एकत्र बसवून ठरवेल. यावेळी जागा वाटपावरून वादावादी होईल, घासाघीस होईल, एखाद दोन जागेवरून स्पर्धाही होईल. पण आम्ही जागा वाटपाचा प्रश्न सामंजस्याने सोडवू. भाजप सरकार येऊ नये म्हणून आम्ही एकास एक उमेदवार देऊ, असं सांगतानाच लोकसभा निवडणुकीत मोदी परत आले तर राज्यात विधानसभा निवडणूकच होणार नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.

कोर्टानेच निर्णय घ्यावा

आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरूनही त्यांनी अत्यंत नाराजी व्यक्त केली. पक्षांतर बंदी कायदा कुचकामी ठरला आहे. ही दुर्देवी गोष्ट आहे. विधानसभा अध्यक्ष अजूनही आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देत नाहीत. सर्वोच्च न्यायालय हतबल आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेच ठोस निर्णय घेतला पाहिजे. विधानसभा अध्यक्ष एका पक्षाचे आहेत. त्यामुळे ते आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर काही निर्णय लवकर देतील असं वाटत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

आम्ही पहिलं पाऊल उचललं

आरक्षणाच्या मुद्द्यावरही चव्हाण यांनी भाष्य केलं. मी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी पहिलं पाऊल उचलण्यात आलं होतं. पण आरक्षणासाठी गायकवाड आयोगावेळी योग्य टक्केवारी निघाली नाही. त्यामुळे तो प्रश्न मार्गी लागला नाही. आता राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून वेळ मागितला आहे. येणाऱ्या काळात काय होतं ते पाहू, असं ते म्हणाले.


सरकार बदललं पाहिजे

ड्रग्स प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ससूनमधून ड्रग्स माफिया फरार होतो, हे गृहखात्याचं अपयश आहे. गृहमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाची जबाबदारी घ्यावी. पण या सरकारमध्ये नैतिकता राहिलीच नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची बाबही गंभीर आहे. त्यामुळे आता सरकार बदलणं हाच एकमेव पर्याय आहे. सरकार बदललं पाहिजे, असं सांगतानाच ससून प्रकरणात अनेक मंत्र्यांची नावे येत आहेत. पण या प्रकरणातील सगळं समोर येईल की दडपलं जाईल माहिती नाही. पण जे घडतं ते दुर्दैवी आहे, असंही त्यांनी सांगितलं.





0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने