Punere Dandiya : भारीच! मुळा मुठा नदीच्या किनारी रंगला दांडिया

 

ब्युरो टीम : मुळा मुठा नदीच्या किनारी सोमवार (२३ ऑक्टोबर २०२३) रोजी पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘पुणेरी नवरात्री फेस्ट’ हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. पुणे शहर व परिसरातील हजारो नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्वांनी मुळा-मुठा नदीकिनारी मनसोक्त दांडिया खेळण्याचा आनंद लुटला. येरवडा ब्रिज ते संगमवाडी ब्रिज दरम्यान गणपती विसर्जन घाटाजवळील सॅम्पल स्ट्रेचवर हा कार्यक्रम झाला. 

पुणे महानगरपालिकेने मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत येरवडा ब्रिज ते संगमवाडी ब्रिज दरम्यान गणपती विसर्जन घाटाजवळ ३०० मीटरचा सॅम्पल स्ट्रेच तयार करण्यात आला आहे. हा सॅम्पल स्ट्रेच नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. जास्तीतजास्त नागरिकांना हा सॅम्पल स्ट्रेच पाहता यावा, यासाठी महानगरपालिका सॅम्पल स्ट्रेचवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. ८ सप्टेंबर २०२३ रोजी सॅम्पल स्ट्रेचवर महाविद्यालयीन तरुणांसाठी ‘पुणेरी हॅपी यूथ फेस्ट’ उपक्रमाचे आयोजन महानगरपालिकेने केले होते. महाविद्यालयीन तरुणांचा चांगला प्रतिसाद त्या उपक्रमाला मिळाला होता. तर, सोमवारी महानगरपालिकेने नागरिकांसाठी ‘पुणेरी नवरात्री फेस्ट’चे आयोजन सॅम्पल स्ट्रेचवर केले होते.

मुळा मुठा नदी किनारी नवरात्री फेस्ट हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यामागे महानगरपालिकेची एक संकल्पना होती. मुळा-मुठा नदीचा किनारा रात्रीच्या वेळीही किती सुंदर दिसू शकतो, महानगरपालिका यासाठी कसे प्रयत्न करीत आहेत, हे नागरिकांना समजावे, यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिक व नदी यांच्यातील नाते  दृढ होण्यास मदत झाल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनीही या उपक्रमात सहभागी होत, नागरिकांना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची माहिती दिली.

नागरिकांनी केले कौतुक

पुणे महानगरपालिकेने यावेळी दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सेल्फी कॉर्नर, ३६० डिग्री फोटो बूथ तसेच विविध गेमचेही आयोजन केले होते. या सर्वांना चांगला प्रतिसाद नागरिकांनी दिला. नागरिकांना ऑन दी स्पॉट फोटो प्रिंट दिली जात होती. तसेच महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना अल्पोपहार सुद्धा देण्यात आला. अनेकांनी महानगरपालिकेच्या या उपक्रमांचे कौतुक केले.

एनसीसी कॅडेटची लक्षणीय उपस्थिती

पुणेरी नवरात्री फेस्ट या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या कॅडेटची लक्षणीय उपस्थिती होती. जवळपास ६०० एनसीसी छात्र या उपक्रमात सहभागी झाले होते. एनसीसी ग्रुप कॅप्टन अभिजीत खेडकर यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावत एनसीसी छात्रांचा उत्साह वाढवला. याप्रसंगी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे अनेकांनी कौतुक करीत असा नदी किनारा प्रत्येक शहरांमध्ये होणे गरजेचे असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने