Punit Balan: पुनीत बालन यांना ३ कोटींचा दंड ; पुण्यातील गणेश मंडळानी मांडली आपली भूमिका

 

ब्युरो टीम : पुण्यातील उद्योजक पुनित बालन यांना पुणे महापालिकेकडून शहरभर अनधिकृत होर्डिग्ज  लावल्याबद्दल 3 कोटी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या दंडाविरोधात आता पुण्यातील काही गणेश मंडळं एकत्र येत त्यांनी दंडाविरोधात महापालिकेला निवेदन दिलं आहे. WE support PUNIT BALAN, असं म्हणत पुनित बालन यांना पाठिंबा देण्यासाठी गणेश मंडळं एकत्र आले आहेत. दंड मागे न घेतल्यास योग्य पावलं उचलू, अशा इशारा मंडळांनी पालिकेला दिला आहे. 

बालन यांनी पुण्यातील गणेश मंडळांना प्रचंड प्रमाणात देणग्या दिल्याने गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात पुनित बालन आणि त्यांच्या मिनरल वॉटर ब्रॅण्डचे संपूर्ण शहरात फ्लेक्स लावण्यात आले होते. याच फ्लेक्स आणि फोटोंना अनधिकृत ठरवून महापालिकेने त्यांना तीन कोटी वीस लाखांचा दंड ठोठावला आहे. पालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात आज गणेश मंडळे एकत्र आली होती आणि त्यांनी पुणे महानगरपालिकेला निवेदन दिले आहे. पुनीत बालन यांनी आर्थिक मदत केल्याने गणेशोत्सव इतक्या सहजतेने पार पडला आणि आम्ही देखील त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत, अशी भूमिका गणेश मंडळांनी घेतली आहे.

पुनित बालन यांनी आम्हा सर्वांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आर्थिक मदत केली. ती मदत केल्यामुळे बालन यांना पुणे महानगर पालिकेने शिक्षा दिली. याचा निषेध करण्यासाठी आम्ही गणेशमंडळांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र यायचं ठरवलं आहे आणि हा दंड माफ करावा, अशी विनंती महापालिकेकडे निवेदन दिलं आहे, शांततामय मार्गाने महापालिकेत एकत्र आलो असल्याचं गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. 

गणेशोत्सव झाल्यानंतर पाच दिवसांनी जर नोटीस बजावत असाल तर यात महापालिकेचा वैयक्तिक द्वेष दिसून येत आहे. या सगळ्यामागे सुत्रधार कोण आहे?, याचा शोध घेतला पाहिजे. आम्हाला मदत करणाऱ्यावर दंड ठोठवला आणि गणपती मंडळाचे कार्यकर्ते शांत बसलो तर कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जाईल, असंही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. 

...तर गणेश मंडळं एकत्र येऊ आणि पुढची योग्य पावलं टाकू!

पुण्यातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. देशात नाही तर जगात पुण्यातील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. त्यांनाच साथ देणाऱ्यावर अशी परिस्थिती येत असेल तर हे चुकीचं धोरण आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही सगळे गणेश मंडळं एकत्र येऊ आणि पुढची योग्य पावलं टाकू, असाही इशाराही त्यांनी दिला आहे. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने