ब्युरो टीम : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आर्किटेक्ट, इंजीनिअर आणि राज्यकर्त्यांची सौंदर्य दृष्टी यावरून राज्यकर्त्यांवर जोरदार टीका केली. आजच्या राज्यकर्त्यांकडे सौंदर्यदृष्टीच नाहीये. त्यामुळे आपल्याकडे शहराचं व्यवस्थित प्लानिंग होत नाही. महापालिकांमध्ये आर्किटेक्चरपेक्षा इंजिनीअरला अधिक महत्त्व आहे, असं सांगतानाच माझ्या हातात सत्ता आली तर महाराष्ट्राची प्लॅनिंग करण्याची जबाबदारी मी आर्किटेक्चरकडे देईल, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
पुण्यातील एका कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. मी तुम्हाला शब्द देतो. माझ्या हातात उद्या सत्ता आली तर महाराष्ट्राचं प्लॅनिंग करण्याची जबाबदारी मी आर्किटेक्चरकडे देईन. माझा शब्द हा शब्द असतो. मी उद्या इंजीनिअरच्या कार्यक्रमाला गेलो तरी तुमचंच नाव घेईल. तिकडे गेलो म्हणून त्यांचं नाव घेणार नाही. मी इतर राज्यकर्त्यांसारखा नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.
शहरं आहेत की डान्सबार
मुंबईतील रस्त्यांवर लाईट लावण्यात आले आहेत. लाईट अशा प्रकारे लावण्यात आलेय की सालं कळतंच नाही ही शहरं आहे की डान्सबार आहेत?, असं सांगतानाच तुम्ही मुंबईच्या शिवाजी पार्कात या. तिथे सिंह आहेत. त्या सिंहाना खालून लाल दिव्यांचा प्रकाश मारला आहे. ते पाहताना सिंहाला मूळव्याध झाला की काय असं दिसतं? अशी टीका राज ठाकरे यांनी केली. असं कधी ब्युटिफिकेशन असतं का? हे नगरसेवक, आमदार अभ्यासगट म्हणून परदेश दौऱ्यावर जातात. तिथे काही बघत नाही का? तिथल्या शहराचा विकास दिसत नाही का? बरं जमत नसेल तर अरबांसारखं तरी वागा. त्यांच्याकडे मेंदू नाही, पैसे आहेत. त्यामुळे मेंदू विकत घ्या. इतर लोकांना बोलवा आणि कामं करून घ्या ना, असा सल्ला त्यांनी दिला.
इंजिनीयरला जेवढं महत्त्व
राजाला सौंदर्यदृष्टी असेल तर खाली त्याचं संचित होतं. आपल्याकडे महानगर पालिकांकडे टाऊन प्लॅनिंग नाही. इंजिनीयरला जेवढं पालिकेत महत्त्व आहे. तेवढं आर्किटेक्चरला नाही. मी राज्यातील एका सर्किट हाऊसला गेलो होतो. तिथे एवढा मोठा बाथरूम पाहिला. तिथे काय पळत पळत जाऊन आंघोळ करायची आहे का? कशाला हवा एवढा बाथरूम. त्यानंतर दुसऱ्या एका सर्किट हाऊसला गेलो. तिथे हॉल प्रचंड मोठा होता. तिथे एक पलंग ठेवला होता. तिथे नवीन जोडप गेलं तर त्यांनी काय पकडापकडी खेळायचीय का? असा संताप व्यक्त करतानाच ज्या राज्यात गाडगेबाबांचा जन्म झाला. तिथे स्वच्छता शिकवावी लागते हे दुर्देव आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
पुण्याची वाट लागायला
आपल्याकडे प्रदूषण बेसुमार वाढलं आहे. हाजी अलीला समुद्र राहिला नाही. काल परवा बातमी वाचली, मुंबईत सर्वाधिक प्रदूषण आहे. मी पुण्यात अनेकदा सांगितलंय. मुंबईची वाट लागायला एक काळ लोटला. पुण्याची वाट लागायला वेळ लागणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
टिप्पणी पोस्ट करा