Sambhajiraje Chatrpati : जरांगे पाटलांचे उपोषण पुन्हा सुरु; छत्रपती संभाजीराजे अंतरवाली सराटीत भेटीला

 

ब्युरो टीम : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची डेडलाईन कालच संपली आहे. काल दिवसभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाची घोषणा केली नाही. उलट छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठ्याांना आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कधीपर्यंत देणार ते काहीच सांगितलं नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न अंधांतरीच लटकण्याची चिन्हे आहेत. असं असलं तरी मनोज जरांगे पाटील मात्र आमरण उपोषणावर ठाम आहेत. आजपासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषण करणार आहेत. त्यामुळे या उपोषणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे पाटील हे आज अंतरवली सराटीत उपोषणाला बसणार आहेत. त्यांचं हे आमरण उपोषण सुरू असणार आहे. यावेळी अन्नपाणी आणि औषधेही घेणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच येत्या 28 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा सांगणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणापूर्वीच छत्रपती संभाजीराजे त्यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी 12.30 वाजता संभाजीराजे आणि जरांगे पाटील यांची भेट होणार आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची खलबते होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संभाजीराजे पहिले नेते

मागच्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर त्यांना भेटायला जाणारे संभाजीराजे हे पहिले नेते होते. सर्वात आधी संभाजीराजे यांनी अंतरवलीत जाऊन जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता. आज पुन्हा एकदा जरांगे पाटील उपोषणाला बसत आहेत. त्यामुळे संभाजीराजे त्यांची भेट घेणार असून यावेळीही जरांगे यांना भेटणारे संभाजीराजे हे पहिलेच नेते असणार आहेत.

गावगावात उपोषण

आजपासून मराठा समाजही उपोषण करणार आहे. गावागावातील सर्कलवर मराठा समाज जमणार असून त्या ठिकाणी साखळी उपोषण करणार आहे. त्यामुळे मराठा आंदोलन चिघळणार असल्याचं चित्र आहे. तसेच आजपासून मराठा आंदोलक गावागावात कँडलमार्चही काढणार आहेत. काही गावांनी तर राज्यातील सर्व पक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. अंतरवली सराटीतही आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात आली आहे. जे नेते वैधानिक पदावर नाहीत, अशा नेत्यांना मात्र गावात प्रवेश दिला जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने