ब्युरो टीम : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणास बसले आहेत. सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोबरपासून उपोषण सुरु केले. त्यानंतर राज्यात पुन्हा हा विषय चर्चेला आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी त्यासंदर्भाच केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी दिल्ली येथे गेल्याच्या बातम्या आल्या. या सर्व प्रकरणात गुरुवारी शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली. यावेळी मोजक्याच शब्दांत शरद पवार यांनी उत्तर दिले.
काय म्हणाले शरद पवार
बारामतीमध्ये 18 आणि 19 जानेवारी 2024 ला कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनासंदर्भात गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, साखरेचे प्रमाण वाढेल कसे? यासंदर्भात प्रदर्शनातून माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजेच व्हिएसआयची भूमिका महत्वाची ठरणार आहे. आजच्या बैठकीत याविषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीत जे प्रेझेंटेशन दिले ते ऊस शेतीसाठी महत्वपूर्ण असणार आहे. यावेळी मराठा आरक्षण आणि इतर राजकीय विषयांवर प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, त्या विषयांवर आता बोलायचं नाही.
मराठा आरक्षणासाठी रोहित पवार यांचे आंदोलन
मराठा आरक्षणासाठी रोहित पवार यांनी गुरुवारी अन्नत्याग आंदोलन केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रोहित पवार यांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. सध्या रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरूच आहे. त्या यात्रेत त्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. रोहित पवार उद्या सणसवाडी ते पाडोळी असे 18 किमी अंतर पायी चालणार आहे.
परभणीत निवडणुकीवर बहिष्कार
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी परभणीच्या पालम तालुक्यातील चाटोरी येथे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला. ग्रामपंचायत पोटनिवडणुकीवर 4 उमेदवारांसह संपूर्ण गावाकडून बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे .
टिप्पणी पोस्ट करा