Shivendra raje Bhosale : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदित्य ठाकरेंना आव्हान; 'वाघनखे खोटी, हे सिद्ध करावं'

 

ब्युरो टीम: छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात येत आहेत. या गोष्टीचे कौतुक करायचे सोडून विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाघनखे खरी आहेत का, हे आम्हाला विचारण्यापेक्षा आमदार आदित्य ठाकरे यांनी ती खोटी आहेत, हे सिद्ध करून दाखवावं, असे आव्हान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व परिसराची स्वच्छता केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी वाघनखांवर उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत माध्यमांनी विचारताच आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने लंडन येथे असलेली वाघनखे भारतात आणली जाणार आहे. तत्पूर्वीच विरोधकांकडून या विषयाचे राजकारण सुरू करण्यात आले आहे. ही वाघनखे खरी आहेत, हे सिद्ध करा, असं ते म्हणत आहेत. मग आमचेही त्यांना आव्हान आहे की, ही वाघनखे खोटी असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवावं.'

ज्या गोष्टीशी मराठी माणसांची अस्मिता जोडली गेली आहे, त्याचे राजकारण न करता आदित्य ठाकरे यांनी मुंबईत येऊन वाघनखांचं पूजन करावं, दर्शन घ्यावं, असा सल्ला त्यांनी दिला. वाघनखे भारतात आल्यानंतर साताऱ्यातही त्यांची मिरवणूक काढली जाईल, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

यावेळी माजी नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने