ब्युरो टीम : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार ओसीबी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे, असं प्रतिपादन यावेळी मा. प्रदेशाध्यक्षांनी केलं.
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातल्या सकल मराठा समाजानं केलेली आंदोलनं सबंध महाराष्ट्र आणि देशानं पाहिली आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्पष्ट भूमिका आहे. मा. मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीबाबत राज्य सरकार संपूर्णपणे सकारात्मक आहे. मात्र, आरक्षणाचा निर्णय घेताना टिकणारं आरक्षण दिलं जावं ही महायुती सरकारची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व बाबींचा सारासार कायदेशीर विचार करून मराठा आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार पावलं उचलत आहे. त्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती राज्यभरात जाऊन अहवाल तयार करण्याचं काम करत आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष मा. सुनिल तटकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. सोबतच आगामी काळात मराठा आरक्षण देण्यात महायुती सरकार निश्चित यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
टिप्पणी पोस्ट करा