ब्युरो टीम : राज्याच्या राजकारणात अजूनही काही नवीन चमत्कार बाकी आहेत का? अशी शंका येऊ लागली आहे. कारण, बारामतीमध्ये दिवाळीनिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेत. त्यावरून सत्ताधारी नेत्यांनीच दिलेल्या प्रतिक्रियांनी भुवया उंचावल्या आहेत. दिवाळीनंतर काही वेगळं? अजित पवार कुटुंब पुन्हा एकत्र येऊन पक्ष म्हणून येईल असं वाटतं का? असे भाजपचे मंत्री यांना विचारलं. तेव्हा ते म्हणतात की. त्यांच्या डोक्यात काय चाललेलं असतं ते घटना घडल्याशिवाय काही कळत नाही. त्यामुळे मला नेमकं काय चाललं आहे ते कळत नाही, असे ते म्हणालेत. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी तर मी अभ्यास करतोय तुमच्याकडं काय माहिती असेल तर मला तुम्ही द्या, असे म्हटलंय.
दिवाळीनिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले. मात्र, या भेटीवरून शिंदे गट आणि भाजपच्या मनात शंकेची पाल चुकचुकल्याचं दिसलं. राष्ट्रवादी फुटीनंतर पवार कुटुंब बारामतीत पहिल्यांदाच एकत्र आले. दिवाळीनिमित्त सर्व अजित पवार, शरद पवारांसह सर्व पवार कुटुंबीयांनी एकत्रित फोटोही काढले. यावर चंद्रकांत पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया ही भुवया उंचावणारी आहे.
शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब त्यांच्या डोक्यात काय चाललेलं असतं? तर ते घटना घडल्याशिवाय काही कळत नाही. कित्येक वर्षापासून ही परंपरा आहे गोविंद बागेची. सर्व पवार कुटुंबीय एकत्र येतात. स्नेहभोजन करतात. एकूण एकाशी चर्चा करतात. गप्पा मारतात. अनेक वर्षाची ती परंपरा आहे. आणि ती कायम आहे. ती तुटणारी नाही. राजकारण वेगळ्या ठिकाणी राजकीय भूमिका वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पण, कुटुंब म्हणून ते एकसंघपणे ते राहतात. आमच्या सगळ्या आमदारामध्ये मंत्र्यामध्ये कुठलाही संभ्रम नाही असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही या भेटीबद्दल नेमकं काय चाललंय असं म्हणत शंका वर्तवली. एक गोष्ट मला अजून कळत नाही. मी अभ्यास करतो त्याच्यावर की कधी कधी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दादा शरद पवारांचे आशीर्वाद घ्यायला गेले मी समजू शकतो. पुन्हा काल दिलीप वळसे पाटील साहेब गेले. अजित दादा पण आशीर्वाद घ्यायला गेले. तटकरे साहेब पण आशीर्वाद घ्यायला गेले. इथून ते शहा साहेबांना भेटला, दिल्लीत गेले. हे मला काय नेमकं कळत नाही. याचा अभ्यास करतोय असे कदम म्हणाले.
दादा येत्या काही दिवसांमध्ये फटाका फोडतील. दादा सकाळपासून रात्री काय पण करू शकतात. सकाळी सहा वाजता पण ते शपथ घेऊ शकतात. त्यांचे आमदार कधीही आंदोलन करू शकतात. कधी शरद पवार साहेबांना जाऊन आशीर्वाद घेतात. कधी दिल्लीला जातात. दादा दादा आहेत, असेही त्यांनी सांगितले.
रामदास कदम यांच्या या भूमिकेला त्यांच्याच पक्षांचे नेते संजय शिरसाट यांनी छेद दिला. दादाची दादागिरी सगळ्या ठिकाणी चालते. दादा नाराज असतील ना तर दादा स्पष्टपणे सांगतील. दादा जसे सत्तेत आले तसे सत्तेतून बाहेर जायला सुद्धा ते डायरेक्ट छातीठोकपणे जाऊ शकतील. म्हणून त्यांच्याबद्दल आता कॉमेंट करणं योग्य नाही. जसा आम्ही उठाव केला. त्याच पद्धतीने आमच्या भूमिकेला अजित दादांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणून आमच्यामध्ये कुठेही बेबनाव नाही आहे असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आता कितीही भेटीगाठी झाल्या तरी बारामतीचं मैदान शरद पवार मारतील असं म्हणत ठाकरे गटानं सत्ताधारी तिन्ही पक्षांवर टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी मी शरद पवार साहेबांना ओळखतो. अजित पवार आणि शरद पवार तुम्हाला किती एकत्र दिसले तरी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही. यापुढे उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांचेच राजकारण महाराष्ट्रामध्ये यापुढे तुम्हाला यशस्वी झालेलं दिसेल असेही ते म्हणालेत.
टिप्पणी पोस्ट करा