Balasaheb Thakare : बाळ नावाचा - बापमाणूस

 

ब्युरो टीम : सगळीकडे दिवाळीची जोरदार तयारी सुरू होती. रंगीबेरंगी आकाशकंदीलाने सर्व घरे सजली होती. लोकं आनंदात होती. अचानक काही वेळात मातोश्री वरील आकाशकंदील खाली उतरवला गेला. हे दृश्य पाहून लोकांच्या हृदयात धस्स झाले व तेवढ्यात बातमी आली. बाळासाहेब आपल्याला सोडून कायमचे निघून गेले. महाराष्ट्रभर रडण्याचे हुंदके ऐकू येऊ लागले. घराघरात पोरांपासुन थोरांपर्यंत सर्व धर्मीय लोकं हंबरडा फोडत मोठमोठ्याने म्हणत होते "परत या परत या बाळासाहेब परत या" सर्व देश सुतकात पडला होता. खरं तर बाळासाहेब नावाची जादू वेगळीच होती.बाळासाहेबांचे नाव "बाळ" होते पण संपुर्ण देश त्यांना "बाप" म्हणून ओळखत होता. आज (१७ नोव्हें.) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन.त्यानिमित्त त्यांच्या आठवणीनां उजाळा. वडिलांपासून अन्याय विरोधात लढण्याचे संस्कार बाळासाहेबांवर बालपणीच घडले. त्या काळी मुंबईमधे परप्रांतीयांचा लोंढा वाढत होता. मराठी माणसांमधे स्वभिमान उरला नव्हता. महाराष्ट्रात मराठी युवक हे बेरोजगार बनत होते. मराठी माणसांवर अन्याय घडत होता.अशाच काळात मराठी माणसाच्या हक्क व न्यायासाठी बाळासाहेब नावाच्या युगपुरुषाचा जन्म झाला. मराठी माणसात स्वाभिमान जागृत करत अन्यायविरोधात लढण्याचे बाळकडूच बाळासाहेबांनी युवकांना दिले."मार्मिक" व "सामना" वृत्तपत्रातून  अन्याय विरोधात धारधार लेखणीने सरकारला घाम फोडला."शिवसेना" नावाचे रोपटे लावुन मराठी माणसांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हळूहळू शिवसेना शहरांपासुन खेड्यापर्यंत घराघरात पोहचली. गावात घरांवर भगवे झेंडे व युवकांच्या कपाळी भगवे गंध दिसू लागले. बाळासाहेबांनी देशात भगवी लाटच निर्माण केली होती. जिथे अन्याय होई तिथे शिवसैनिक "जय भवानी जय शिवाजी" म्हणत अन्याय करणा-यांना झोडपून काढत. सरकारच्या अन्यायी धोरणविरोधात शिवसैनिक मोर्चे, निषेध, आंदोलने करत शिवसेना स्टाईलने सरकारला विरोध करत असे. कधी कधी तर जाळपोळ, तोडफोड  शिवसैनिक कडुन होत असे. पण बाळासाहेबांचा शब्द शिवसैनिक प्राणापलीकडे जपत असे. भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच शिवसैनिकांनी रोखली होती. व्हॅलेंटाइन डे सारख्या परप्रांतीय उत्सवाला शिवसेनेने विरोध केला.बाळासाहेबांची ठाकरी भाषेने विरोधक घायाळ होत असे. बाळासाहेबाच्या सभानां प्रचंड गर्दी होत असत. ठाकरी भाषेच्या प्रेमात पडून मराठी युवक अन्याय विरोधात लढून आपले हक्क मिळवू लागला. "शिवसेना" हे मराठी माणसांना आपले कुटुंब वाटू लागले. शिवसेनेने गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता मिळवली. बाळासाहेब जसे आक्रमक होते तसेच सर्व धर्मीय नेत्यांशी त्यांचे संबध प्रेमाचेच होते.आपल्या भूमिकेवर ठाम कसे रहावे व दिलेला शब्द कसा पाळावा याचे आदर्श उदाहरण  बाळासाहेब स्वतः आहेत. स्वभिमान जपत बाळासाहेबांनी सत्तेसाठी तत्वे, विचारांना कधीचं तिलांजली दिली नाही. बाळासाहेब हे मराठी माणसांचे व शिवसैनिकांचे दैवतं बनले. आजही मातोश्री शिवसैनिकांचे मंदिर आहे. बाळासाहेबाच्या अंत्यविधीस जमलेली अलोट गर्दी  हिच खरी बाळासाहेबांच्या कार्याची पावती आहे. बाळासाहेब जरी आज आमच्यात शरीराने नसले तरी विचाराने, कार्याने नेहमीचं बाळासाहेब आमच्या हदयात दैवतं बनून राहतील. आयुष्य यशस्वी होण्यासाठी बाळासाहेबांनी सांगितलेलं "बाळकडू" आम्हाला नेहमीचं प्रेरणा देत राहील. बाळासाहेबांच्या पवित्र व महान कार्यास विनम्र अभिवादन.

- महेंद्र मिसाळ (प्रसिद्ध व्याख्याते व लेखक)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने