ब्युरो टीम : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वर्ल्डकप 2023 ची चर्चा रंगलेली आहे. वर्ल्डकप 2023 भारताबाहेर जाऊ नये अशी प्रत्येक भारतीय नागरिकाची इच्छा आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 49 वे शतक केले. या क्षणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होता. त्यामागे कारण देखील असंच आहे. विराट कोहली याने 49 वे शतक करत क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर यांच्या वनडे क्रिकेटमधील 49 शतकांची बरोबरी केली आहे. विराट याच्या या विक्रमानंतर सर्वत्र फक्त आणि फक्त विराट कोहली याची चर्चा रंगली आहे..
सांगायचं झालं तर, विराट कोहली याने 2023 मध्ये स्वतःचं 49 वे शतक पूर्ण केलं आहे. पण याची भविष्यवाणी सचिन यांनी 11 वर्षांपूर्वी केली होती आणि क्रिकेटच्या देवाने केलेली भविष्यवाणी सत्यात देखील उतरली आहे. सध्या सोशल मीडियावर सचिन तेंडुलकर यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सर्वांसमोर सचिन यांनी विराट कोहली याच्यावर असलेला विश्वास व्यक्त केला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ 2012 मधील आहे. सचिन यांनी आशिया कप 2012 मध्ये स्वतःचे 100 वे शतक झळकावले होते. सचिन तेंडुलकर यांनी रचलेला विक्रम साजरा करण्यासाठी देशातली प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं.
मुकेश अंबानी यांनी आयोजीत केलेल्या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी देखील होते. यावेळी अभिनेता सलमान खान याने सचिन यांना काही प्रश्न विचारले होते. ‘सचिन तुम्हाला काय वाटतं तुमचा रेकॉर्ड कोणी मोडू शकेल.. सरळ – सरळ नाही सांगून टाका…’ यावर सचिन म्हणाले, ‘मला असं वाटतं याठिकाणी बसलेले तरुण आहेत… ‘
यावर सलमान म्हणतो, ‘शक्यच नाही…’, पुढे सचिन म्हणतात, ‘मला दिसत आहेत याठिकाणी तरुण, जे विक्रम रचू शकतात. विराट, रोहित करु शकतात आणि जर कोणी भारतीय माझा रेकॉर्ड मोडणार असेल तर मला काही आपत्ती नाही…’ असं देखील सचिन सर्वांसमोर म्हणाले आणि या क्षणाचा साक्षीदार सलमान खान याच्यासोबत अंबानी कुंटुब आणि उपस्थित सेलिब्रिटी ठरले…
सध्या सर्वत्र सचिन तेंडुलकर यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विराट कोहली यांच्या दमदार खेळीनंतर सोशल मीडियावर फक्त आणि फक्त क्रिकेटपटूची चर्चा होती. अनेक भारतीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला. विराट कोहली याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने देखील ‘वाढदिवसाच्या दिवशी स्वतःला भेट…’ असं म्हणत आनंद व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा