Crime : बायको हरवल्याची पोलिसात दिली तक्रार, तपासात समोर आलं धक्कादायक सत्य



ब्युरो टीम :  पोलीस ठाण्यात जाऊन एका व्यक्तीनं त्याची बायको हरवली आहे, अशी तक्रार दिली. पोलिसांनी देखील तक्रार दाखल करून तपास सुरू केला. मात्र, या तपासात बायको हरवल्याची तक्रार देणाऱ्या पतीनेच त्याच्या पत्नीचा खून केल्याचं धक्कादायक सत्य समोरं आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात हा प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ज्ञानदेव ऊर्फ माऊली पोपट आमटे (वय 33, रा. पारगांव सुद्रीक, ता. श्रीगोंदा) याला अटक केली आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केलीय. 

आरोपी ज्ञानदेव आमटे याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात त्याची पत्नी रुपाली ज्ञानदेव आमटे ही हरवली असल्याची तक्रार दिली होती. पण रुपाली हिचा भाऊ रोहित संतोष मडके याला रुपाली गायब होण्यामागे तिचा पती ज्ञानदेव आमटे असल्याचा संशय होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी त्यादृष्टिनं तपास सुरू केला. अखेर तपासामध्ये ज्ञानदेव आमटे यानेच रुपाली हिचा खून करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे समोर आले. परंतु पोलिसांनी आरोपीला अटक करण्यापूर्वीच तो फरार झाला होता. आरोपीला पकडण्यासाठी अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले होते. 

पोलिसांचे पथक आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हा अहमदाबाद, गुजरात येथे असल्याची माहिती त्यांना 18 नोव्हेंबर पासून आरोपी गुजरात राज्यात गेला असल्याची माहिती मिळाली होती. आरोपी हा वेळोवेळी वास्तव्याचे ठिकाण बदलत होता. त्याचा पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुजरात राज्यातील विविध ठिकाणचे हॉटेल, लॉजेस व टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आरोपीचा शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. 

म्हणून केला बायकोचा खून

आरोपी ज्ञानदेव आमटे याच्याकडे पोलिसांनी गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की, तो कंत्राटी व्यवसाया निमित्त वेळोवेळी बाहेरगांवी जात असल्याचं कारणावरुन पत्नी रुपाली ही त्याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेवुन वारंवार वाद घालत होती. 10 नोव्हेंबर रोजी रुपाली व आरोपीमध्ये वाद झाला. त्याचवेळी रागाचे भरात आरोपीने रुपालीचे नाक - तोंड तसेच गळा आवळुन खून केला, व  प्रेत घराच्या जवळ खड्डयात पुरले. त्यानंतर पोलीस ठाण्यात जात ज्ञानदेव आमटे याने पत्नी रुपाली हरवली असल्याची खोटी तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने हा तपास केला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने