Devendra Fadnavis : ‘त्या’ फोटोवरून देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले 'ही तर संजय राऊत यांची विकृत मानसिकता...'



ब्युरो टीम : संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊतील कसिनोत बसलेला एक कथित फोटो शेअर केला. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राऊतांच्या या पोस्टवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी या पोस्टमधून राऊतांची विकृत मानसिकता दिसते, असा हल्लाबोल केला. ते माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले,'संजय राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो पोस्ट केला आहे. पूर्ण फोटोत हे स्पष्टपणे लक्षात येतं की, तेथे बावनकुळे, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी, नातू असं सगळं कुटुंब आहे. त्यामुळे ही विकृत मानसिकता कुठेतरी संपवली पाहिजे. या प्रकारात संजय राऊत यांची विकृत मानसिकता  दिसत आहे. ते किती उताविळ झालेत हेही त्यातून दिसतं. चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह त्या हॉटेलला थांबले होते. त्यांनी जेथे जेवण केलं ते रेस्टॉरंट आणि बाजूचं केसिनो हे एकत्र होतं,' असेही फडणवीस म्हणाले.

'एखाद्याला व्यक्तिगतपणे लक्ष्य केलं जात आहे, यापेक्षा खालची पातळी काय असू शकते. ते असे मॉर्फ केलेले फोटो, कापलेले फोटो पोस्ट करून वाईट आरोप करत आहेत. हे राजकारणाची पातळी खाली नेणंच आहे,' अशी टीकाही फडणवीसांनी केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने