Dhangar Reserv : धनगर आरक्षण प्रश्न पेटला; आंदोलकाकडून जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक

 

ब्युरो टीम : धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्च्याला जालन्यात हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. या मोर्चा दरम्यान जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला खाली आली नाहीत, त्यामुळे आंदोलन आक्रमक झाले. यावेळी आंदोलकांनी गेटवरून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी तुफान दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या जिल्हाधिकारी परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. 

धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ज्यात, जिल्ह्यातील समस्त धनगर समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार होता. हा मोर्चा गांधी चमन येथून सुरू होऊन शनि मंदिर, उड्डाणपुल, नुतन वसाहत, अंबड चौफुलीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले आणि नेत्यांचे भाषण झाले. भाषणानंतर काही लोकांनी जिल्हाधिकारी यांनी खाली येऊन निवेदन घेण्याची मागणी केली. पण, जिल्हाधिकारी खाली न आल्याने काही तरुण आक्रमक झाल्याचा आरोप केला जात आहे. तसेच, आक्रमक झालेल्या तरुणांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून तोडफोड करायला सुरवात केली. पाहता पाहता मोठा जमाव जिल्हाधिकारी कार्यालयात घुसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

'या' आहेत मागण्या...

धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची (एसटी) अंमलबजावणी करावी

शहरातील अंबड चौफुली परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास जागा उपलब्ध करून द्यावी

जातनिहाय जनगणना करण्यात यावी

मेंढपाळांना शस्त्र परवाने द्यावे, मेंढ्यांना चरण्यासाठी वने राखीव ठेवावी

शेळी मेंढी विकास महामंडळास दहा हजार कोटींचा निधी देण्यात यावा

प्रत्येक जिल्ह्यात धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्तीगृह उपलब्ध करून द्यावे

आरक्षण लढयात शहीद झालेल्या समाजबांधवांच्या कुंटूबातील एकास शासकीय नोकरी द्यावी

शासनामार्फत सवलतीच्या दरात कर्ज द्यावे

सर्वच क्षेत्रातील खासगीकरण रद्द करावे आदी मागण्या नमुद करण्यात आल्या आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने