Dhirendra Shastri Bageshwar Dham : धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज पुण्यात, हिंदूराष्ट्र निर्मितीबाबत केलं महत्त्वाचं विधान



ब्युरो टीम : ‘भारतीय राज्यघटनेत आतापर्यंत सव्वाशे वेळा दुरुस्त्या झाल्या असून, एकदा हिंदूराष्ट्र निर्मितीसाठीही दुरुस्ती केली पाहिजे,’ अशी भूमिका धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना मांडली आहे. 

‘हिंदूराष्ट्र किंवा रामराज्यात अल्पसंख्यांकांना कोठेही जाण्याची गरज नाही. तेथे सामाजिक समरसता, समानता व धर्मांतर्गत कर्माला महत्त्व असेल. मात्र, एखाद्याच्या हृदयात खोट असेल, तर त्याला हिंदूराष्ट्रात जागा नसेल,’ असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

जगदीश मुळीक फाउंडेशनतर्फे संगमवाडी येथे बागेश्वर धाम सरकार यांच्या तीन दिवसीय ‘हनुमान सत्संग कथा’ व ‘दिव्य दरबार’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. फाउंडेशनचे जगदीश मुळीक व योगेश मुळीक उपस्थित होते. 

दरम्यान, ‘बागेश्वर धाम सरकार यांचे दावे घटनाविरोधी, अवैज्ञानिक व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली होती. त्यावरही धीरेंद्र शास्त्री यांनी भाष्य केले. ते म्हणाले,’ ‘सनातन भारतीय संस्कृती व हिंदू एकता दृढ करण्यासाठी आम्ही ‘दरबार’ भरवतो. त्यावर कोणाला आक्षेप असल्यास त्यांनी दरबारात येऊन म्हणणे मांडावे. आमने-सामने करून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या, पण कारणे सांगू नका,’ असे सांगत धीरेंद्र शास्त्री यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला एकप्रकारे आव्हानच दिलं आहे. त्यामुळे आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे आव्हान स्वीकारते का, याकडे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने