ब्युरो टीम : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अहमदनगर जिल्ह्याचा संभाव्य दौरा असून दौऱ्यादरम्यान चोख व्यवस्था ठेवण्याबरोबरच अधिकाऱ्यांना नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आज, मंगळवारी (21 नोव्हेंबर 2023) झालेल्या बैठकीत दिले आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संभाव्य अहमदनगर जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सभागृहात पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘राष्ट्रपती थांबणार आहेत, त्या विश्रामगृह तसेच भेट देणार असलेल्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात यावा. राष्ट्रपती ज्या मार्गाने प्रवास करणार आहेत त्या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यात यावे. आवश्यकतेनुसार रस्त्यांची दुरुस्ती करून घेण्यात यावी. मान्यवर भेट देण्यात येणाऱ्या ठिकाणी स्वच्छता राहील यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही सालीमठ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
संपूर्ण दौऱ्यादरम्यान वीज पुरवठा सुरळीत ठेवावा. रस्त्यावरील सर्व विद्युत तारांची तपासणी करण्यात यावी. अद्यावत आरोग्य पथक सर्व सुविधांसह सज्ज ठेवण्यात यावे. दौऱ्यादरम्यान कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच या काळामध्ये कुठल्याही अधिकारी, कर्मचाऱ्याने विनापरवानगी मुख्यालय न सोडण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा