Eknath Shinde : मुबई , पुण्यात वाढले प्रदूषण ' सरकार कृत्रिम पाऊस पडण्याच्या तयारीत ? मुख्यमंत्र्यांची बैठक

 

ब्युरो टीम : मुंबई आणि पुण्यात सध्या प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. धुळीचे प्रचंड कण हवेत मिसळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना श्वसनाचा त्रास होण्याचा धोका आहे. त्यामुळे सरकारकडून प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. यावेळी प्रदुषणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. प्रदूषण रोखता यावं यासाठी काय-काय करता येईल, याबाबत चर्चा झाली. यावेळी कृत्रिम पाऊस पाडण्याबाबतची चर्चा झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.

“प्रदूषण कमी करण्यासाठी काय-काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा केली. लवकरच या सर्व उपाययोजनांमुळे प्रदूषण कमी होईल. नागरिकांचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात आले आहेत.मुंबई महापालिकेलादेखील सूचना दिलेल्या आहेत. रस्त्यावर असेलेली धूळ, बांधकामांमुळे असलेली धूळ, माती रस्त्यावर दिसता कामा नये. हजार टँकरच्या माध्यमातून मुंबईतील सर्व रस्ते पाण्याने धुवावेत, असे निर्देश दिले आहेत”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री काय-काय म्हणाले?

“आवश्यकता भासल्यास फॉगरही वापरता येतील. क्लाउड सिडिंगची आवश्यकता नाही. कारण काल पाऊस पडलाय. जे आवश्यक असेल ते सर्व वापरण्याची सूचना दिलेल्या आहेत. संपूर्ण राज्यातील महापालिकेच्या आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले आहे, पर्यावरण विभागाला दररोज मॉनिटरींग करा, असं सांगितलं आहे. हे वायू प्रदूषणव तात्काळ कमी झालं पाहिजे. त्यासाठी शहरी भागातही झाडे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी सर्व पातळीवरच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तात्काळ होईल. नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“मुंबई उच्च न्यायालयाने काही सूचना दिल्या आहेत. त्यांचं तंतोतंत पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. पर्यावरण विभागाच्या गाईडलाईन्स अतिशय प्रभावीपणे लागू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या लागू करण्याबाबत मोठा दिलासा मिळालाय”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी क्लाउड सिडिंग अर्थात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. “काल पाऊस पडला आहे. गरज पडली तर क्लाउड सिडिंगची सूचना दिली आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

कृत्रिम पाऊस कसा पाडला जातो?

क्लाउड सिडिंग या प्रक्रियेलाच आपण कृत्रिम पाऊस म्हणतो. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विशेष विमान, हेलिकॉप्टर किंवा रॉकेटच्या माध्यमातून आकाशात सिल्व्हर आयोडाईड, क्लोराईड सारखे रसायनांची फवारणी केली जाते. या माध्यमातून नैसर्गिक पडणाऱ्या पावसाच्या प्रक्रियेला उत्तेजित केलं जातं. त्यातून पुढे प्रक्रिया होऊन पाऊस पडतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने