ब्युरो टीम : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात बंड झाले. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधी भूमिका घेतली. अजित पवार सरळ भाजप-शिवसेनेसोबत गेले आणि राज्यातील सत्तेमध्ये सहभागी झाले. त्यानंतर शरद पवार यांनी राज्यात दौरे सुरु केले. शरद पवार यांना उत्तर देण्यासाठी अजित पवार यांनी उत्तर सभा घेतल्या. गेल्या चार महिन्यांत पवार कुटुंबियांच्या संबंध कसे राहिले? हे सर्व राज्याने पाहिले. परंतु आता दिवाळी सण आला आहे. दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबीय दरवर्षी एकत्र येतात. दिवाळीचा पाडवा आणि बारामतीमधील गोविंदबाग हे समीकरण अनेक वर्षांपासून ठरलेले आहे. दिवाळी पाडव्याला सर्वांना शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र गोविंद बागेत भेटतात. ही परंपरा यंदा खंडीत होणार आहे.
अजित पवार गोविंद बागेत जाणार नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविना गोंविदबागेत यंदाचा दिवाळी पाडवा होणार आहे. दरवर्षी बारामतीत दिवाळी पाडव्यानिमित्त पवार कुटुंबीय एकत्र येत असतात आणि जनतेच्या शुभेच्छा स्वीकारत असतात. यामुळे पवार कुटुंबियांवर प्रेम करणारे सर्वजण दिवाळी पाडव्याला गोविंद बागेत जात असतात. यंदा मात्र दिवाळी पाडव्याला अजित पवार नागरिकांना भेटणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव अजित पवार आणखी काही दिवस नागरिकांना भेटणार नाहीत.
फुटीनंतर ही पहिलीच दिवाळी
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ही पवार कुटुंबियांची पहिली दिवाळी आहे. दरवर्षी एकत्र येणारे पवार कुटुंबात यंदा अजित पवार नसणार नाही. अजित पवार यांना डेंग्यू झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार यांच्या काटेवाडी गावात ते मतदानास गेले नव्हते. या निवडणुकीत अजित पवार यांचे वर्चस्व बारामती तालुक्यात सिद्ध झाले. तालुक्यातील ३२ पैकी ३० ग्रामपंचयातीवर अजित पवार यांनी वर्चस्व मिळवले. २ ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. शरद पवार गटाला एकाही ठिकाणी यश मिळाले नाही.
टिप्पणी पोस्ट करा