health: मित्र मॉर्निंग वॉकसाठी येईना; मित्रांनी बँड बाजा वाजवत नेला दारात व्हिडिओची जिल्ह्यात चर्चा!

 

ब्युरो टीम : कुंभकर्ण म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? झोप! तुमच्यापैकी देखील काहीजणांना झोपायला प्रचंड आवडत असेल. झोप आवडण्याचे पण प्रकार असतात. कधी कुणाला दुपारी झोपायला आवडतं, कुणाला रात्री लवकर झोपायला आवडतं तर कुणाला सकाळी उशिरापर्यंत झोपायला आवडतं. काही नग तर ऑफिसात, शाळेत, कॉलेजात झोपा काढतात. “झोप” हा लोकांसाठी खूप खूप जिव्हाळ्याचा विषय! आता हाच व्हिडीओ बघा, हा व्हिडीओ बघून तुम्ही खूप हसाल. आपला मित्र खूप दिवस झालं मॉर्निंग वॉकला आलाच नाही म्हणून या लोकांनी चक्क बँड बाजाच त्याच्या दारात नेला! खरंय! मित्र कधी काय करतील याचा नेम नसतो. आता या बँड बाजा नेणाऱ्या मित्रांची अख्ख्या जिल्ह्यात चर्चा आहे.

झोपेतून उठवायला बँड बाजा

मित्र कधी काय करतील हे तुम्ही ठामपणे सांगू शकता का? कुणीच सांगू शकत नाही. आपल्या सवयी आपल्या घरच्यांपेक्षाही जास्त चांगल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना माहित असतात. या आपल्या मित्रवर्गाला चांगलं माहित असतं की एखाद्या गोष्टीतून आपल्याला बाहेर काढायचं कसं. बुलढाण्यातील खामगाव मधला हा मजेशीर किस्सा आहे. मित्रवर्ग रोज ठरलेल्या वेळेत सकाळी फिरायला जात असेल, पण तीन दिवस झालं एकजण आलाच नाही. मग आता एकजणाला मित्रवर्ग फोन करून करून हैराण झाला असेल किंवा कदाचित त्यांचा फोनच उचलला गेला नसेल असं आपण समजूयात. तब्बल तीन दिवस वाट बघून अखेर हा मित्रवर्ग या एकजणाला झोपेतून उठवायला बँड बाजाच घेऊन गेला. आता या कारामतीची चर्चा गावभर होतेय.

बँड बाजा घेऊन मित्राच्या दारात!

व्हिडीओमध्ये बघा, 6-7 जणांचं टोळकं हसत-हसत बँड बाजा घेऊन आपल्या मित्राच्या दारात पोहचलंय. हे सगळे आपल्या मित्राची मजा घेणारे चेहरे प्रचंड खुललेत! वाजत गाजत ते त्यांच्या झोपलेल्या मित्राला उठवतायत. मित्र सुद्धा घरातल्या कपड्यांवर बाहेर आलाय. बाहेर येताच तोही हसू लागतो, त्यालाही काय करावं सुचत नाही. त्याला दिसतं आपलं टोळकं आपली मजा घेतंय. व्हिडीओ बघून तोही हात जोडतो आणि थोड्यावेळाने लाजत बँड वाल्यांना शांत व्हायला सांगतो. हा व्हिडीओ बघून तुम्हालाही तुमच्या काही मित्रांची आठवण येईल, तुम्हालाही तुमचे मित्रांसोबतचे दिवस आठवतील.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने